आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिसांवरच दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘नो पार्किंग’ येथे वाहन जप्त करत असताना कारवाई प्रसंगी पोलिसांवर दोघा युवकांनी दगडफेक केली. त्यात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस जखमी झाले. दगडफेक करून दोघेही पळून गेले. जुना एम्प्लॉयमेंट चौकात सोमवारी सकाळी अकाराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी पोलिस हवालदार राजेंद्र खटके यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सह्याद्री शॉपिंग सेंटरसमोर वाहने लावण्यास मनाई आहे. तेथील दुचाकी ताब्यात घेताना कारवाई सुरू होती. त्यास या युवकांनी विरोध केला. त्यात त्यांचेही वाहन होते. दंड भरल्याशिवाय वाहन मिळणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी दंड भरण्यास नकार देत उलट हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ केली. त्यांच्या अरेरावीस पोलिस बधत नसल्याचे पाहून त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोघे पोलिस आणि खासगी क्रेन चालवणारे काही कर्मचारी सोबत होते. मात्र, अचानक आणि अनपेक्षितपणे दडगफेकीला सामोरे जावे लागलेल्या बेसावध पोलिसांना स्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. दगडफेक करून दोघे युवक पसार झाले. सदर बझार पोलिसात याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

येथील दुकानांसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहने नेहमीच थांबतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस नेहमीच कारवाई करत असतात. दररोज चार-पाच वेळा या परिसरातील वाहने क्रेनद्वारे पोलिस नेतात. इमारतीत मागच्या बाजूस वाहनतळ आहे. त्याचा वापर खूप कमी लोक करतात.

हवालदार खटके यांना तातडीने नियंत्रण कक्षाच्या व्हॅनमधून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. चार टाके पडले आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक वाय. बी. शिर्के व त्यांचे कर्मचारी रुग्णालयात आले. बेशिस्त वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई सुरूच राहील. पोलिसांवर हात उगारणार्‍यावर कडक कारवाई करू, असा इशारा श्री. शिर्के यांना दिला.

दुचाकी ताब्यात
दगडफेक केल्यानंतर दोघा तरुणांनी पळ काढला. दोन दुचाकी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्याच्याआधारे दोघा तरुणांचा शोध सुरू आहे. दुचाकीवर ‘सरकार’ असा मजकूर लिहिला आहे.

शिस्त नको का?
शहरात तेरा चौकांत सिग्नल यंत्रणा सुरू आहे. साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम, निरीक्षक शिर्के वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना करत आहेत. मात्र, सिग्नल चौकात कोणालाही दोन मिनिटे थांबायला वेळ नाही. लाल दिवा चालू असताना दुचाकीस्वार तसेच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. झेब्रा क्रॉस पट्टय़ांचा कुणीही नियम पाळत नाही. त्यापुढे येऊन थांबतात. नो-पार्किंग झोनमध्ये वाहने लावली जातात. वन-वेतून ये-जा चालू असते.