आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तिला’ एड्स; ‘त्याला’ आले रडू, विवाहपूर्व एड्स लपवल्याने तो पश्चात्तापात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सीमाला शरीरात बदल घडतोय, याची चाहूल लागताच तिने रुग्णालय गाठून तपासणी केली.. ती गरोदर निघाली. त्यानंतरची एचआयव्हीची तिची टेस्ट झाली. रिपोर्ट येण्यापूर्वी सीमाला आई होण्याच्या आनंदाने आकाश ठेंगणे झाले.तिचा तो आनंद मात्र, औटघटकेचा ठरला. कारण रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला आणि तिच्या आनंदाला तडा गेला. हे सारं माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं..सीमासह बाळंही एचआयव्हीबाधित निघणार म्हणून आणि त्यासाठी मीच कारण ठरलो, हे सांगताना पश्चात्ताप झालेल्या राहुलला रडू कोसळले..जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसटीआय समुपदेशक रिना धोटे यांनी सीमा-राहुल (बदललेली नावे) या दाम्पत्याची कहाणी सांगून लग्नापूर्वीच्या एड्सच्या चाचणीचे महत्त्व विषद केले.

जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रिना धोटे यांनी ‘दैनिक दिव्य-मराठी’ला या रोगाविषयी आणि त्याच्या लपवण्यामुळे निर्माण होणार्‍या धोक्याविषयीची माहिती उदाहरणासह दिली. रिना धोटे यांनी एका दाम्पत्याची कहाणी ऐकवली. लग्नापूर्वी हुंडा व इतर देणे-घेणे, जन्मपत्रिका याविषयी सविस्तर चर्चा घडते. परंतु, शारीरिक काही चाचण्यांचा विषय कोणालाही सूचत नाही. एड्स चाचणीही त्यातलीच एक असून, त्याकडे मात्र दुर्लक्ष होते आणि एकामुळे दोघा-तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, याकडे धोटे यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे आलेल्या राहुल-सीमा या दाम्पत्याच्या आयुष्यातील कहाणी त्यांनी सांगितली.

सीमा ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे तिला तिच्या पतीला म्हणजे राहुलला टेस्टसाठी आणायला सांगितले. टेस्ट केल्यानंतर तोही पॉझिटिव्ह निघाला. समुपदेशातून त्यांची पूर्वआयुष्याची माहिती घेतली. दोघांनाही सोबत बोलावले जायचे. तिसर्‍या वेळी राहुल एकटाच आला आणि त्याने सर्व माहिती गुप्तता पाळणार्‍या आमच्या विभागाविषयी असलेल्या विश्वासावर सांगितली. राहुलने लग्नापूर्वीच आपण पॉझिटिव्ह असल्याची माहिती घरच्यांपासून दूर ठेवल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे मान्य केले. नाहक भीती आणि व्यर्थ वाटणारा धोका यामुळे सारं लपवून लग्न केले. त्या चुकीमुळे दोन जीव आपल्यामुळे उद्ध्वस्त झाले. यात आपल्या पत्नीची काय चूक म्हणून त्याला पश्चात्ताप होऊन रडू कोसळले.

राहुल-सीमा हे अकोल्यातील एक समोर आलेलं उदाहरण आहे. लग्नापूर्वीची एचआयव्हीची टेस्ट हा काही चारित्र्यावरचा अविश्वास नसून, तो एक सुरक्षित मार्ग आहे. किमान राहुल-सीमाच्या उदाहरणावरून तरी एचआयव्ही टेस्टकडे दुर्लक्ष करू नये. विशेषत: पालकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज समुपदेशक रिना धोटे यांनी व्यक्त केली.

शासकीय रुग्णालयात आयसीटीसी केंद्र
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे राबवण्यात येणार्‍या एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र (आयसीटीसी) कार्यरत आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेची रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये असे केंद्र आहेत. त्यामध्ये एचआयव्ही एड्ससंबंधी व वैद्यकीय सेवेबाबत माहिती दिली जाते. या आजारामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक किंवा सामाजिक समस्या अशा विषयांवरही केंद्रामध्ये मार्गदर्शन केले जाते.