आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे हटवण्यासाठी 2.8 कोटींचा खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नगरोत्थान योजनेतून शहरात 238 कोटींचे रस्ते होत आहेत. त्यास अडथळा ठरणारे पथदिव्यांचे खांब बाजूला हलविण्यासाठी महापालिका सभागृहाने मान्यता दिली. दोन कोटी 79 लाख रुपये खर्च या कामासाठी येणार आहे. त्यास महापालिका सभागृहाने एकमताने मान्यता दिली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची मनपा सभा शुक्रवारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

सावस्कर विषय प्रलंबित
नगर अभियंता सुभाष सावस्कर यांना निलंबित करण्यात आल्याने त्यांचा विषय सभागृहापुढे होता तो सभागृहापुढे प्राधान्याने आणला नाही. त्यामुळे तो विषय प्रलंबित आहे.

मार्कंडेय लघुउद्योग संस्थेच्या विषयाला मिळाली एकमताने मान्यता
कर्णिक नगरमधील सुमारे सात एकर जागा लघुउद्योगासाठी असताना त्या जागेवर रहिवाशांनी झोन करण्यापूर्वी बांधकाम केले आहे. या प्रकरणी अपंग संघटनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. रहिवाशांनी झोनची परवानगी नसताना घरकुल बांधले. औद्योगिक वापरातून रहिवासी झोनला परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी सभागृहापुढे ठेवला होता. त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे विरोधी पक्षाने सभागृहात आवाज उठवला नाही.

रस्त्याच्या विषयाकडे महापौरांचे दुर्लक्ष
महापालिका सभा सुरू होताच नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल लक्षवेधी देण्याची मागणी केली. खराब रस्त्यांच्या बाबतीत आयुक्तांनी आपले मत सभागृहात व्यक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याकडे महापौर अलका राठोड यांनी दुर्लक्ष करीत पुढील विषय घेण्यास सांगितले. शहरातील खड्डे दुरुस्ती करण्यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एक कोटी रुपयांची मागणी तातडीचा प्रस्ताव दाखल करून केली.