आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा दिवस - महसूल कर्मचा-यांच्या संपामुळे शेकडो फाइली थांबल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विविध मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. त्याच्या तिस-या दिवशी म्हणजेच सोमवारी महसूलच्या कामकाजावर परिणाम दिसून आला. नायब तहसीलदार ते कोतवालापर्यंत सर्व कर्मचारी संपात सहभागी आहेत. अनेक महत्त्वाच्या फायली जागेवरच थांबल्या तर सेतू कार्यालयातून आलेले दाखले सह्यांसाठी पडून आहेत.

मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा संघटनेने घेतला आहे. यामुळे बहुतेक सर्व कर्मचारी कार्यालयात नाहीत. संप कधी मिटेल, याविषयी संघटनेच्या पदाधिका-यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले. संपामध्ये जिल्हाधिकारी, प्रांत व तहसील कार्यालयातील एक हजारपेक्षा अधिक कर्मचा-यांनी सहभाग नोंदवित संप 100 टक्के यशस्वी केला. मात्र, या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह व इतर सर्व कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.

महसूल प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार संपामध्ये 1 हजार 196 कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 25 नायब तहसीलदार, 162 अव्वल कारकून, 258 लिपीक, 203 शिपाई, 529 कोतवाल सहभागी झाले होते. यामध्ये एकाही तलाठी व मंडलाधिका-यांनी सहभाग नोंदविला नाही.

प्रमुख मागण्या अशा
नायब तहसीलदाराच्या गे्रडपेमध्ये वाढ, लिपिकांचे पदनाम बदलून महसूल साहाय्यक करावे, चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या निवृत्तीनंतर त्याच्या पाल्यास सेवेत सामावून घ्यावे, कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, नायब तहसीलदार वर्गातील पदे बढतीने भरावीत, एमपीएससी परीक्षेत नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदे भरती करताना 5 टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना सायकलऐवजी मोटारसायकल अग्रीम मंजूर करावा, चालकांना विशेष भत्ता द्यावा, अस्थायी पदे स्थायी करावीत, कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्यावी, शिपाई वर्गातून तलाठी वर्गात बढती लागू करावी, कर्मचा-यांवरील हल्ले रोखण्यासाठी अधिक शिक्षेचा कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

राज्य अध्यक्षांनी घेतली भेट
राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांसमवेत चर्चा केली. 1 ऑगस्टपासून संघटनेने संप पुकारला असून 6 ऑगस्ट रोजी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांविषयी बैठक आयोजिली आहे. बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास 7 ऑगस्टपासून संपाची तीव्रता आणखी वाढविण्यात येणार असल्याचे राज्याध्यक्ष पाचारणे यांनी सांगितले. या संपात प्रवीण शिरसीकर, रविकिरण कदम, सागर उबाळे, जयंत जुगदार, रियाज कुरणे, मल्लिनाथ लकडे, धैर्यशील जाधव, जयश्री स्वामी, जयश्री पंचे, राजकुमार वाघमारे, अजय गेंगाणे, रवी कुलकर्णी, राजेंद्र दुलंगे, चैतन्य खरात, काशिनाथ बुरांडे, सोमनाथ ताटे, दिलवर वाघमारे आदी उपस्थित होते.