भूम - विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, विद्यार्थ्यांमधून भविष्यात सक्षम नेतृत्व उदयास यावे, यासाठी उमाचीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध खात्यांचेही वाटप करण्यात आले असून, त्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून शाळेचा कारभार खुद्द विद्यार्थीच पाहात आहेत.
आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याची भावी पिढी तयार होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना नेतृत्व करण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे असते. तसेच बालवयातच लोकशाही मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये होणे अपेक्षित असते. त्यातूनच तालुक्यातील उमाचीवाडी येथे विद्यार्थी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. शाळेने विविध खाती निर्माण करून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. लोकशाहीचे शिक्षण प्रत्यक्ष कृतीने समजण्यासाठी निवडणुकीचे सर्व निकष समोर ठेवून मंत्री निवडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावण्यात आली. यामध्ये प्रत्येक पदासाठी दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मतदान पार पडले. मतमोजणी करून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विजेत्या उमेदवारांची घोषणा केली. या निवडणुकीत विद्यार्थिनींना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. शालेय मंत्रिमंडळ स्थापनेच्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शेळके, सरपंच धनंजय शेळके, उपसरपंच सुभाष शेळके, शाळेचे मुख्याध्यापक मनोज जगदाळे, शिक्षक हरिदास झणझणे, काशीनाथ दुधाळ आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये खाते वाटप
सोमवारी (दि.30) उमाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत निवडलेल्या शालेय मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज शिवाजी गावडे (इयत्ता 5 वी ), उपमुख्यमंत्री राजेश काका गावडे (4 थी) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अभ्यासमंत्री-शुभांगी सुभाष शेळके (5 वी), क्रीडामंत्री-शामल शिवाजी शेंबडे (5 वी), सांस्कृतिकमंत्री सुचिता सुधाकर गावडे (5वी), स्वच्छतामंत्री- प्रतिक सुभाष शेळके (2 री), पर्यावरणमंत्री- महेश दत्तात्रय चिकणे (5 वी), जलमंत्री- सौरव नाना शिंगटे (4 थी), पोषण आहारमंत्री- वैभव महादेव जाधव (4 थी) यांची निवड झाली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीमध्येही स्थान
नवनियुक्त मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री पृथ्वीराज गावडे व सांस्कृतिकमंत्री सुचिता सुधाकर गावडे यांना शालेय व्यवस्थापन समितीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्थान दिले गेले आहे. यापुढे शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक बैठकीमध्ये त्यांना निमंत्रित केले जाणार आहे, चर्चेत सहभाग दिला जाणार आहे. यापूर्वी वर्गप्रतिनिधी म्हणून निवडले जात होते. यापुढे वर्गप्रतिनिधी ऐवजी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून नेतृत्व केले जाणार आहे. शाळेला शिस्त लागावी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शालेय शिक्षण समितीचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. या समितीवर विद्यार्थ्यांची निवड केल्यामुळे त्यांच्या समस्या समजण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यांची बँक सुरू करणार
या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आगामी काळात शैक्षणिक सहलीसाठी मिनी बँकही उघडण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागण्यास मदत होईल. दरम्यान, लोकशाहीची जाणीवजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना लोकशाही समजण्यासाठी अन्य शाळांनीही असे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
उपक्रम फायद्याचा
- लोकशाहीची जाणीवजागृती करण्यासाठी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना लोकशाही समजण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम चांगला आहे. असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबवणे गरजेचे आहे.’’ तृप्ती अंधारे, गटशिक्षण अधिकारी, भूम.