आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज बसच्या धडकेने विद्यार्थी ठार, नागरिकांनी ‘व्हीव्हीपी’ची बस पेटवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसची धडक बसल्याने शिकवणीस निघालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी व्हीव्हीपी महाविद्यालयाची बस पेटवली. सोलापूरपासून आठ किलोमीटरवर असलेल्या सोरेगावजवळ सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

राहुल भैरप्पा म्हेत्रे (वय 16, रा. अमर नगर, सोरेगाव) हा सायंकाळी घरातून बाहेर पडून शिकवणीस जात होता. व्हीव्हीपी कॉलेजची बस (एमएच 13 एएक्स - 0455) विजापूर महामार्गावर सोरेगावकडून सोलापूरकडे निघाली होती. सोरेगाव येथील हॉटेल नागेशच्या गेटजवळ राहुलला या बसची धडक बसली. मागील चाकाखाली चिरडल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला. तेथील नागरिकांनी विद्यार्थ्यांना खाली उतरवून बस पेटवून दिली. विजापूर नाका पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

वेशीपासून गावापर्यंत बंदोबस्त
महिनाभरापूर्वी देगाव येथे जैन श्रावकांना घेऊन जाणार्‍या बसला पेटवून देण्यात आले होते. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी अपघातस्थळी वज्र वाहन, वेशीमध्ये किमान 20 पोलिस कर्मचारी, वेशीच्या आत एक मोबाइल व्हॅन आणि 15 ते 20 कर्मचारी आणि महाविद्यालयाच्या प्रांगणातही जवळपास 20 कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लावला होता. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

पोलिस बंदोबस्तात बस रवाना
अपघातामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे इतर बसही पोलिस बंदोबस्तात सोडण्यात आल्या. शेवटची बस सायंकाळी सात वाजता महाविद्यालयाबाहेर पडली. तोपर्यंत विद्यार्थ्यांना बाहेर सोडण्यात आले नव्हते.