सोलापूर-तीन वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू. आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत होती. छोटा भाऊ सहावीत शिकतोय. राहण्यासाठी जेमतेम पत्र्याचं घर. सुटीदिवशी व फावल्या वेळेत कुठेही मिळेल तिथे काम करायचा. वेळप्रसंगी एमआयडीसी चिंचोळी-कोंडी परिसरात हमाली करायचा. शिकून सवरून मोठ व्हावं, आई, भावाला आनंदात ठेवावं ही उर्मी मनात ठेवून जीवनात संघर्ष करणारा आकाश हरिशचंद्र चव्हाण (वय 16) याचा बुधवारी दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. दहावीची परीक्षा देऊन पायी घरी जाताना ट्रॅक्टरची धडक बसली, अन् आकाशचा संघर्ष थांबला.
कोंडी येथे जिजामाता शाळेत तो शिकत होता. भोगाव येथील शाळेत दहावी परीक्षा क्रमांक आला होता. सोमवारी हिंदीचा पेपर होता. परीक्षा देऊन सर्व विद्यार्थी टेम्पोतून शाळेजवळ उतरले. घरी पायी जाताना गावाजवळील रामनगरात गणपती मंदिराजवळ बीबीदारफळहून तिर्हेकडे ऊस घेऊन जाणार्या ट्रॅक्टरची धडक बसली. छाती, पोटावरून चाक गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो मरण पावल्याचे सांगण्यात आले. दुपारी तीनच्या सुमाराला हा अपघात झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. साहाय्यक फौजदार भीमा गायकवाड तपास करीत आहेत.
आई, नातेवाइकांना शोक
शासकीय रुग्णालयात आई,नातेवाइक यांना शोक अनावर झाला. आता मी तुला कोठू शोधू. माझा मुलगा मिळेल का, असे म्हणत धायमोकलून आई रडत होती.