सोलापूर - दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या तालुक्यासाठी असलेल्या सेतू कार्यालयात विद्यार्थी अन् पालकांची तोबा गर्दी पाहण्यास मिळाली. गेल्या तीन दिवसांत जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रिमिलेअर यासाठी तीन हजारपेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्याचे सेतूचालकांकडून सांगण्यात आले.
प्रवेशासाठी जात, उत्पन्न व रहिवास हे दाखले जोडणे बंधनकारक असल्याने व पहिल्यांदाच महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी व पालकांकडून विविध प्रकारच्या दाखल्यांचे अर्ज दाखल केले आहेत. सोमवार, मंगळवारी व बुधवारी हे तीनही दिवस सेतू कार्यालय हाऊसफुल्ल असल्याचे दिसून आले. प्रतिज्ञापत्र काढणे, अर्ज तपासून घेणे व यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या सर्व खिडक्या दिवसभर हाऊसफुल्ल होत्या.
संभाव्य गर्दी लक्षात घेत सेतू चालकांनी अधिक कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. मात्र अर्जदारांची संख्या पाहता गर्दी वाढतच आहे. जिल्ह्यातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी मतमोजणीसाठी पुणे येथे गेले असल्याने गेल्या दोन दिवसांत तयार झालेल्या दाखल्यावर सह्या झाल्या नाहीत. यामुळे येत्या दोन दिवसांत दाखल्यांची संख्या वाढणार आहे. दाखल्यासाठीची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सेतू चालकांनी सर्वांना रांगेत थांबून अर्ज दाखल करण्यासाठी तीन सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. ओबीसी आणि तीन वर्ष उत्पन्न दाखल्यावर संबंधित अधिकार्यांच्या सह्याच न झाल्याने 500 पेक्षा अधिक दाखले प्रलंबित आहेत. शिवाय 300 दाखल्यांना हरकती लावल्याने ते दुरुस्तीसाठी संबंधित अधिकार्यांकडेच आहेत
(फोटो - बुधवारी सेतू कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.छाया : दिव्य मराठी)