आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर, आम्हाला अॅडमिशन द्या प्लीज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आम्ही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. सर, प्लीज अॅडमिशन द्या की... अशा विनवण्या प्राचार्य आणि विद्यापीठास करूनही पुढील वर्षात प्रवेश मिळत नसल्याने शेकडो विद्यार्थी यंदा हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या मान्यतेसाठी महाविद्यालये विद्यापीठाकडे तर विद्यापीठ शासनाकडे बोट दाखवत आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न जैसे थे आहे. वाढीव विद्यार्थी असलेल्या प्रत्येक महाविद्यालयासमोर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थी या समस्येला तोंड देत आहेत.
गतवर्षी शहर जिल्ह्यातील वालचंद, दयानंद, संगमेश्वर, हिराचंद नेमचंद, दयानंद वेलणकर, एलबीपीएम, बुर्ला महिला आदींसह विविध महाविद्यालयांत बी.कॉम बी.एस्सी. या वर्गासाठी दहा टक्के वाढीव विद्यार्थी संख्येला मान्यता देण्यात आली होती. ही मान्यता केवळ एक वर्षासाठीच दिली गेली आहे, असे शासन मान्यतेच्या पत्रात नमूद असल्याचे विद्यापीठाचे मत आहे. पर्यायाने आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश नाकारण्याचे कटू काम महाविद्यालयांच्या वाट्याला आले आहे. जोपर्यंत या वाढीव विद्यार्थी संख्येला शासन मान्यता मिळत नाही, तोपर्यंत प्रश्न लोंबकळत राहणार आहे.
गतवेळी मान्यता दिली, पण यंदा प्रवेश नाही
मागील वर्षी विद्यार्थी संख्या जास्त असल्याने दहा टक्के वाढीव प्रवेशाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे या जागांवर जास्तीचे प्रवेश महाविद्यालयांनी दिले होते. ते विद्यापीठाने गतवर्षी मान्य केले. त्याच विद्यार्थ्यांना आता पुढील वर्षातील प्रवेश मिळत नाही. यातून प्रश्न उद्भवला आहे. यंदा एकाही तुकडीला, वाढीव विद्यार्थी संख्येला मान्यता देण्याचे धोरण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडील उच्च शिक्षण विभागाने घेतले असल्याने हा पेच आहे.
घोटाळ्यातून बाहेर पडा आणि प्रश्न सोडवा
- काँग्रेस शासनाच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न तत्काळ दखल घेऊन सोडवण्याचा प्रयत्न असायचा.शिक्षणमंत्र्यांची पदवीच संदिग्ध आहे, तेथे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य कसे मिळेल ? विविध घोटाळ्यांतून बाहेर पडत या सरकारने वाढीव विद्यार्थी प्रवेशासंदर्भातील हा प्रश्न प्राधान्याने सोडवला पाहिजे. कुलगुरू डॉ. मालदार यांच्याशी मी चर्चा केली आहे.
प्रणिती शिंदे, आमदार
राजकीय प्रयत्न व्हावेत
- विद्यार्थी संख्या जास्त असल्याने वाढीव प्रवेशाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठाने पाठपुरावा करावा. प्राचार्य संघटनेने कुलगुरूंशी चर्चा केली आहे. प्रश्न शासन स्तरावरील आहे. तो सोडवला जाणे अपेक्षित आहे. राजकीय नेतृत्वानेही या प्रश्नी लक्ष घातले तर लवकर मार्ग निघू शकेल.
प्रा. डॉ. राजेंद्र शेंडगे, सचिव, प्राचार्य संघटना विद्यापीठ
विद्यापीठाकडून पाठपुरावा सुरू आहे
- ३ जुलै २०१४ च्या शासन मान्यतेच्या पत्रात केवळ एक वर्षासाठीच महाविद्यालयांना तुकडी मान्यता देण्यात आल्याचे नमूद आहे. विद्यापीठ या प्रश्नी पाठपुरावा करत आहे. नैसर्गिक न्यायाने पुढील वर्षासाठी प्रवेश मिळावा, ही अपेक्षा रास्त आहे. लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल.
डॉ. आर. वाय. पाटील, संचालक, बीसीयूडी, सोलापूर विद्यापीठ
पाठपुराव्याची आहे गरज
- यावर्षी नव्याने वाढीव संख्येला मान्यता देण्याचे धोरण असल्याचे विद्यापिठाकडून सांगितले जाते. पण गतवर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचे ? याबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे. वाढीव संख्येला नैसर्गिक न्यायाने यावर्षी मान्यता मिळाली पाहिजे.
एस. एन. सलवदे, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, सोलापूर विद्यापीठ