आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहोळ - अडचणीतील साखर उद्योग वाचवण्यासाठी केंद्राकडून कारखान्यांना प्रतिक्विंटल 330 रुपये अनुदान दिले आहे. त्यांनी ते प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रविवारी (कै.) भीमराव महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, 25 मेगाव्ॉट वीजप्रकल्पाचे भूमिपूजन आणि पाच हजार टन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
हमीभावासाठी आग्रही
शिंदे म्हणाले, कृषी मालाच्या हमी भावाबाबत आम्ही आग्रही आहोत. शेतकर्यांच्या मदतीसाठी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 65 हजार कोटींचे पॅकेज दिले. त्यामुळे येत्या काळात उसाला चांगला भाव मिळेल.
महिनाअखेर वीजजोड
पवार म्हणाले, तोडलेले वीजजोड जोडण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पिके वाचवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत सर्व वीजजोड जोडण्यात येतील. मात्र, शेतकर्यांनीही बिले भरण्याची तयारी ठेवावी.
महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत
धनंजय महाडिक यांना कोल्हापुरातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे संकेत केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी दिले. महाडिक यांनी तयारीला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मोहोळ तालुक्याकडे जरा दुर्लक्ष केले तरी चालेल परंतु कोल्हापुरात लक्ष द्या, असेही त्यांनी महाडिक यांना सांगितले. तुम्ही आमचे उद्याचे सहकारी आहात, असेही त्यांनी म्हटले.
शेतकर्यांच्या हितासाठी लढणार
कै. भीमराव महाडिक यांनी स्वत: आर्थिक झळ सोसून कारखान्यासाठी भाग भांडवल उभे केले. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील आपली जमीन विकल्याचे कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच त्यांनी शेतकर्यांची वीजजोडणी न तोडण्याची मागणी पवार व शिंदे यांच्याकडे केली. यंदाच्या दुष्काळात कोल्हापुरातून चारा, धान्य जमा करून त्याचे येथे वाटप केले. दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न केला. कारखान्याची सूत्रे हाती येताच, वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला. हंगामी कामगारांना कायम केले. महाविद्यालय सुरू केले. यापुढेही शेतकर्यांच्या हितासाठी लढणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.