आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळबाग अनुदानातील गैरव्यवहार चौकशीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुळशी (ता. माढा) येथील फळबागांना मदत वाटपाच्या अनुदानात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी कृषी अधिकार्‍याचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. येत्या दोन दिवसात हे पथक तेथे जाऊन चौकशी करून त्याबाबतचा अहवाल देणार आहे.

तुळशीमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाबाबत‘दिव्य मराठी’ने गेली तीन दिवस सलगपणे या गैरव्यवहाराची पुराव्यासह सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर कृषी अधीक्षक नाईकवाडी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय घेतला. तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी चौकशी त्या भागातल्या अधिकार्‍यांकडून करण्याऐवजी त्याची जबाबदारी दक्षिण सोलापूरचे मंडल कृषी अधिकारी उप्पीन यांच्याकडे दिली आहे. अन्य आठ कृषी अधिकार्‍यांसह ते या प्रकरणाची चौकशी करतील. येत्या दोन दिवसांत हे पथक तेथे जाईल, गावातील लोकांशी चर्चा करेल, प्रत्यक्षात शेतातील फळबागांची पाहणी करेल आणि याबाबतचा अहवाल तयार करेल. चौकशीपर्यंतच हे प्रकरण संपवले नाही, तर कृषी अधीक्षक नाईकवाडी यांनी या प्रकरणानंतर सर्वच तालुका कृषी अधिकार्‍यांना त्यांच्या तालुक्यात यापुढे कोणत्याही प्रकारची अशी तक्रार येता कामा नये, काळजीपूर्वक कामे करा, अशी सक्त सूचना दिली आहे.


कार्यवाही झाली, आता कारवाई करण्यात येणार
तुळशीतील प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक नेमले आहे. प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन चौकशीची कार्यवाही सुरू केली आहे. आता त्यांचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. ’’ रफिक नाईकवाडी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

पात्र लाभार्थ्यांची अडवणूक नको
लाभार्थी पात्र असेल, त्याची कागदपत्रे योग्य असतील, तर त्याचे पैसे अडवू नका, पण एखाद्या प्रकरणात शंका वाटते आहे. सात-बारा उतार्‍यावर किंवा काही नोंदीत काही आहे, तर तत्काळ प्रकरण बाजूला ठेवा, अशा सूचनाही कृषी अधीक्षक नाईकवाडी यांनी तालुक्याच्या कृषी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.