आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - ज्या साखर कारखान्यांनी कर्ज घेऊन तारण असलेली साखर परस्पर विकली; अशा कारखान्यांची गोदामे तपासून दोषींवर गुन्हे नोंदवण्याची मागणी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने मान्य केली. आठ दिवसांत ही कारवाई करण्याचे कबूलही केले. परंतु त्याच्या लेखीपत्रात प्रभारी सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी गुन्हे नोंदवण्याचा आणि मुदतीचा उल्लेख टाळला. हे पत्र हाती पडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपोषणकर्त्यांनी लगेच सरबत तोंडाला लावले.
स्वाभिमानी संघटनेच्या बेमुदत उपोषणाचा रविवारी चौथा दिवस होता. तोडगा काढण्यासाठी खासदार राजू शेट्टी दुपारी उपोषणस्थळी पोहोचले. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, श्री. मोटे आदी चर्चेसाठी आले. संघटनेचे प्रदेश सचिव उत्तम जानकर यांनी, परस्पर साखर विकणार्या कारखान्यांवर दोन दिवसांत गुन्हे नोंदवण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. मोटे यांनी महिन्यांची मुदत मागितली. खासदार शेट्टी यांनी आठ दिवसांची मुदत दिली. ती मान्य करून मोटे बँकेत गेले. त्यानंतर अध्र्या तासाने लेखीपत्र घेऊन आले. परंतु त्यात गुन्हे नोंदवणार असल्याचे म्हटले नाही, मुदतीचा उल्लेख नाही.
कोण काय म्हणाले..
ऊस दरासाठी जेव्हा आंदोलन करतो, त्या वेळी सहकार मोडीत काढणारे म्हणून आमच्यावर टीका होते. परंतु सहकार मोडीत काढणारी खरी नेतेमंडळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बसलेली आहेत. खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कारवाईचे निर्देश दिले
पुण्याच्या विभागीय सहनिबंधकांनी संचालकांना नोटिसा बजावल्या. दोषी संचालकांवर कारवाई करण्याची सूचना केली. या सर्व गोष्टी बँकेने आणि व्यवस्थापनाने करायच्या आहेत. बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक
सहकार खाते काय करते?
बँकेवर प्रभारी सरव्यवस्थापक आहेत. थकबाकी असणारे कारखाने संचालकांचीच आहेत. त्यामुळे कारवाई होईल कशी? सहकार खाते काय करते काय? नुसत्या सूचनांनी काय होणार आहे? लक्ष्मीकांत
ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना
काय म्हटले आहे पत्रात..
1 थकबाकीदार संस्था, कारखाने यांच्या विरुद्ध बँकेने सहकार न्यायालयात दावे दाखल केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार वसुलीसंदर्भात पुढील कार्यवाही करू.
2 कर्जपुरवठा केलेल्या संस्थांचा साखरसाठा नियमित घेतला जातो. थकबाकीदार कारखान्यांकडील शिल्लक मालतारण साठय़ाची तपासणी करून, त्याच्या अहवालानुसार संचालक मंडळाच्या मान्यतेने पुढील कारवाई करू.
3 टेंभुर्णी शाखेचा तत्कालीन शाखाधिकारी रविकांत मारुती बागल याच्या विरोधात टेंभुणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्याने केलेल्या अपहाराची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे.
4 जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना निधी उपलब्धतेनुसार पीककर्जपुरवठा करीत आहोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.