आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांच्या कारखान्याला विरोध, 6 बस फोडल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ - आष्टी (ता. मोहोळ) येथील औदुंबर पाटील सहकारी साखर कारखान्याला बेकायदेशीर परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळ येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पण या आंदोलनाला हुल्लडबाजीमुळे हिंसक वळण लागले. आंदोलकांनी सहा ते सात एसटी बसवर दगडफेक केली. तसेच तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना धक्काबुक्की करत तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते विजयराज डोंगरे, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्यासह 600 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आष्टी येथे कारखाना उभारत आहेत. कारखाना उभारणीसाठी गट नं. 699 मध्ये परवानगी असताना गट नं. 195 व 196 मध्ये कारखाना उभारणी केली. तसेच या उर्वरित पान 12

कारखान्यापासून दोन किलोमीटरवर आष्टी तलाव असल्यामुळे त्याचे पाणी दूषित होणार आहे. त्यामुळे कारखान्याला या भागातील अनेक गावांचा विरोध आहे. याचसंदर्भात गेल्या 11 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आष्टीचे सरपंच मदन पाटील व अन्य 25 गावातील ग्रामस्थांनी कारखान्याला विरोधासाठी शेटफळ चौकात आज सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन आयोजित केले होते. पुरुषांसह महिलांचाही मोठा सहभाग या आंदोलनात होता.

मदन पाटील यांच्यासह अनेकांनी या कारखान्याला विरोध करताना कोणत्याही स्थितीत आम्ही मागे हटणार नाही, बेकायदेशीर परवानगी मिळालेल्या या कारखान्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. एकनाथ वागज, राजाराम भांगे, जे. के. गुंड, माजी सरपंच बाळासो पाटील, कुंडलिक माळी, सुदाम वागज, विक्रम वागज, जीवन भांगे, रामलिंग भांगे, भीमराव पुजारी आदींची भाषणे झाली. आष्टी तलाव वाचवा, दूषित पाणी जनतेला पाजू नका, आदी फलक हातात घेऊन ग्रामस्थ घोषणा देत होते. पण, काही आंदोलकांच्या संतापाचा बांध फुटला आणि थेट रस्त्यावरील वाहनांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये सहा ते सात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. काही प्रवासी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा दुर्दैवी प्रकारही घडला. आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यास तहसीलदार सदाशिव पडदुणे येथे आले. पण, त्यांनाही धक्काबुक्की करत त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. आंदोलनाने अचानकपणे घेतलेल्या या वळणाने वाहतूक खोळंबली आणि या भागात मोठा तणाव निर्माण झाला. पण, पोलिसांनी मोठय़ा प्रयत्नाने गर्दीला आवरले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आंदोलनाकडे दुर्लक्ष ग्रामस्थांचा वाढता रोष
आष्टी येथील कारखान्याच्या बदललेल्या जागेविरुद्ध, ना-हरकत प्रमाणपत्रांबाबत आष्टीसह परिसरातील आठ गावांनी वेळोवेळी हरकत घेतली होती. सोलापुरात सध्या यासंदर्भात उपोषण सुरू आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आष्टी, कामती, शेटफळ आणि परिसरातील लोक रस्त्यावर उतरले होते. ग्रामस्थांच्या रोषाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडला.