आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Factory Work On Water Conservation Activities In Kalamba Taluka

साखर कारखान्याच्या पुढाकारांने कळंब तालुक्यात होणार जलसंधारणाची कामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण - राज्यात सर्वत्र दुष्काळाची चर्चा सुरू असताना काही गावांमध्ये मात्र, गावकर्‍यांनी राबविलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे दुष्काळाच्या झळा दिसत नाहीत. उत्तर महाराष्ट्रातील गावांमध्ये असलेले हे चित्र दिसण्यासाठी कळंब तालुक्यातील रांजणीच्या नॅचरल शुगर साखर कारखान्याने पुढाकार घेतला असून, परिसरातील दहा गावांमध्ये सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी 3 गावांत कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. यामुळे तब्बल 500 हेक्टरवरील क्षेत्राला लाभ मिळणार आहे.

एरव्ही दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यास सिंचनाच्या कामाबाबत मोजमाप आणि त्याची चर्चा सुरू होते. मात्र, त्यानंतर याच कामांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. परिणामी पुन्हा आपण दुष्काळाच्या चक्रात अडकतो. हे चित्र बदलण्यासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष काम करून परिवर्तन घडविण्याचा संकल्प रांजणीच्या नॅचरल शुगर कारखान्याने केला आहे. कारखान्याने परिसरातील 10 गावांची निवड करून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता पांडुरंग तोडकर यांचे मार्गदर्शन घेतले. शासनाकडून वॉटर शेडचे नकाशे घेऊन कारखाना क्षेत्रातील 10 गावांमध्ये समतल पाझर कालवे, नाला रुंदीकरण, खोलीकरण, नालाबंडिंग आदी प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांना 31 जानेवारी 2013 रोजी सुरुवात झाली. शिवारातील पाणी शिवारातच अडवून, मुरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याची ही योजना आहे. सामाजिक बांधिलकीतून सुरू झालेल्या या कामास शेतकर्‍यांचाही प्रतिसाद मिळत आहे. काही शेतकर्‍यांनी आपल्या क्षेत्रातील माळरान जमीन देऊ केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत रांजणी, घारगाव, ताडगाव येथील कामे पूर्ण झाली असून, शिराढोणसह परिसरातल्या 7 गावांतील 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या पावसाळ्यात पाणी साचून त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळावा, असे कारखान्याचे नियोजन आहे. शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाल्यास आगामी पाच वर्षांमध्ये परिसरातील 140 गावांमध्ये कारखाना असा प्रयोग राबविणार आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून सामाजिक उपक्रम राबविणारा नॅचरल शुगर हा पहिला कारखाना असावा, या उपक्रमामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून, उसाबरोबरच फळ, फुलशेतीचे क्षेत्र वाढणार आहे. तसेच दुग्ध उत्पादनातही वाढ होऊ शकते. कारखान्याच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकर्‍यांनी स्वागत केले आहे.
जलसंधारण कामासाठी चारीचे खोदकाम करण्यात आले आहे.

संस्थांनी बोध घेण्याची गरज
नॅचरलचा हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून, हा आदर्श अन्य सेवाभावी संस्था व साखर कारखान्यांनी घेण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी यापुढे पारंपरिक पध्दतीने पिकाला पाणी देण्याची पध्दत बंद करून ठिबक पध्दतीने पिकाला पाणी दिले पाहिजे. उपलब्ध पाण्याचा वापर यापुढे शेतकर्‍यांनी करून पिकांची उत्पादकता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपत्तीचे संधीत रुपांतर
कोणत्याही इष्ट आपत्तीचे संधीत रुपांतर करून त्यावर मात करण्याची मूळ संकल्पना आम्ही पूर्वीपासून प्रत्यक्ष अंमलात आणली असून, यावर्षी उद्भवलेली दुष्काळी परिस्थितीसुध्दा आमच्यासाठी इष्ट आपत्तीच समजून त्यावर कायमस्वरुपी मात करणेसाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.’’ बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, नॅचरल शुगर कारखाना.


जलसंधारणातून उत्पादकता वाढेल
नॅचरल जलसंधारणाच्या माध्यमातून आम्ही निश्चित आमच्या जमिनीची उत्पादकता वाढवण्यात यशस्वी ठरू. भविष्यात कितीही मोठय़ा दुष्काळाचा सामना आम्ही सर्मथपणे पेलू शकू, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.’’ नानासाहेब गरड, शेतकरी घारगाव.


या उपक्रमातून दुष्काळमुक्त होऊ
नॅचरल जलसंधारणाच्या या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून भावी काळात आमचा परिसर हा सुजलाम सुफलाम होणार आहे. या उपक्रमातून आम्ही निश्चितच दुष्काळमुक्त होऊ.’’ प्रदीप गायकवाड, शेतकरी, सौंदणा (आंबा)

जलसंधारण किती लाभदायक
लघु आणि मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साठविण्यात येते. परंतु तरीही दुष्काळ आपली पाठ सोडत नाही. या प्रकल्पातील पाण्याचे 30 ते 40 टक्के बाष्पीभवन होते. सुपीक जमीन पाण्याखाली जाते व माळरानं उघडी राहतात. गावांचे पुनर्वसन करावे लागते. तलावासाठी मोठय़ा प्रमाणात सिमेंट व लोखंडाचा वापर होतो. शेतकर्‍यांची चांगली जमीन या प्रकल्पामध्ये जाते, व्यवस्थापनाचा खर्च वाढत जातो. खर्चाचा कोणताही ताळेबंद लागत नाही. याउलट या जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी जमिनीवर न साठवता जमिनीच्या पोटात साठवले जाते व पाण्याचे बाष्पीभवन होत नाही तसेच ही कामे नापीक म्हणजेच माळरानावरही राबविता येतात. गावांचे पुनर्वसन टळते तसेच खर्चही माफक असतो. शेतकर्‍यांना त्याचा अधिक लाभ होतो.

जलसंधारणाची कामे होत असलेली दहा गावे

रांजणीसह परिसरातील घारगाव, ताडगाव, शिराढोण, सौंदणा (आंबा), वाकडी, लासरा, जायफळ, पिंपरी, आवाड शिरपुरा या दहा गावांमध्ये कारखान्यामार्फत समतल पाझर कालवे, नाला रुंदीकरण, खोलीकरण, नालाबंडिंग आदी प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. यापैकी रांजणी, घारगाव, ताडगाव येथील कामे पूर्ण झाली आहेत. ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविल्यास जिल्हा दुष्काळमुक्त होईल.