आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा, दिवाळीत सोलापुरात स्वस्त साखरेवर संक्रांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गेल्या सहा महिन्यांपासून रास्तभाव धान्य दुकानातून साखर मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे यंदा दसरा व दिवाळी स्वस्त साखरेशिवाय करावे लागणार की काय अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवून साखर देण्यास नकार दिला आहे. त्यासाठी साखरच शिल्लक नसल्याची सबब कारखाने पुढे करत आहेत. यामुळे आठ कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही कारखाने साखर देण्यास बधत नसल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने ऑक्टोबरसाठी नऊ हजार 199 क्विंटल साखरचे नियतन जाहीर केले आहे. यामध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून तीन हजार 176 क्विंटल तर बीबीदारफळ येथील लोकमंगल कारखान्याकडून 6 हजार 20 क्विंटल साखर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, साखर शिल्लक नसल्याचे दोन्ही कारखाने सांगत आहेत.

सप्टेंबरमध्येही सरकारने सहा हजार 955 क्विंटलचे नियतन मंजूर केले होते. यामध्ये विठ्ठल कार्पाेरेशन व लोकनेते कारखान्याकडून साखर घेण्याचे आदेश दिले होते. दोन्ही कारखान्याने साखर देण्यास नकार दिल्याने साखर उपलब्ध होऊ शकली नाही. जुलैचे तर नियतनच कळवण्यात आले नाही. गुन्हे दाखल असलेल्या काही कारखान्यांनी अपील दाखल केले आहे.

साखरच उपलब्ध होत नाही, शासनास कळवू
केंद्र शासन कारखान्यांची नावे व साखरेचे प्रमाण देते तर कारखाने साखर शिल्लक नसल्याचे सांगतात. याबाबत आम्ही कारखान्यांकडून साखर शिल्लक नसल्याचे लेखी मागितले आहे. त्यानुसार आम्ही शासनाला कळवणार आहोत.
-रमेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी