आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या सुलतान हॉटेलवर मनपाचा हातोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक रफिक हत्तुरे (प्रभाग क्र. 26 ब, काँग्रेस) यांच्या बेगम पेठेतील सुलतान हॉटेलवर बांधकाम परवाना विभागाने मंगळवारी दुपारी हातोडा चालवला. वाहनतळ (पार्किंग)जागेमधील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पालिका अधिकार्‍यांशी हत्तुरे यांनी हुज्जत घातली. वृत्तपत्रांचे छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांना शिवीगाळ करून दम दिला.
बेगम पेठेतील हत्तुरे यांच्या सुलतान हॉटेलवर कारवाईस गेलेल्या महापालिका अधिकार्‍यांना ‘हाथ लगानेका नहीं’ असे सांगून काम थांबवले. आपण स्वत: अतिक्रमण काढणार असल्याचे सांगत संथगतीने साहित्य हलवण्यास सुरुवात केली. अधिकारी बघत राहिले. साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे आल्यावर कारवाईला गती देण्यात आली आणि तासाभरात हॉटेल सुलतान काढण्यात आले.
नगरसेवक हत्तुरे यांची पत्नी अमीना व हसीना यांच्या नावाने 21 डिसेंबर 2012 रोजी बांधकाम परवाना देण्यात आला होता. त्यानुसार तळघरात पार्किंग आरक्षण आहे. तरीही हत्तुरे यांनी त्या जागेवर हॉटेल बांधले. त्यासाठी आवश्यक ते फर्निचर आणि इतर सुविधा तेथे करण्यात आल्या होत्या.
हॉटेल शिवपार्वतीच्या पार्किंग जागेतील साहित्य काढले
मंगळवारी सकाळी 11 वाजता महापालिका बांधकाम परवाना विभागाने लकी चौकातील शिवपार्वती हॉटेलमधील पार्किंगच्या जागेतील प्रवीण बार काढले. दीपक भादुले, आर. डी. जाधव, बी. बी. भोसले, वसंत पवार, नजीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. इमारत नगरसेवक मनोहर सपाटे यांच्या मालकीची आहे. कारवाईच्या वेळी ते तेथे उपस्थित नव्हते.
आयुक्तांची बैठक
‘बडे मासे’ मोकळे असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’तून प्रसिद्ध होताच महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मंगळवारी सकाळी आठ वाजता संबंधितांना निवासस्थानी बोलावले. नगरसेवकांनी पार्किंगच्या जागेत केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
नगरसेवकपद जाऊ शकते
बेकायदा बांधकाम स्वत: किंवा पत्नीच्या नावाने केले असेल तर संबंधित नगरसेवकाचे पद अनर्ह ठरवता येते. मुंबई महापालिका कायदा कलम 10 मधील 1 (ड) नुसार कारवाई करता येते. पार्किंगच्या जागेत व्यवसाय सुरू केल्याचे स्पष्ट झाले असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस महापालिका आयुक्त करू शकतात.
हत्तुरे म्हणाले, मैं भी पत्रकार..
पार्किंग जागा मोकळी करण्यासाठी गेले असता, हत्तुरे यांनी सुरुवातीला फोटोग्राफर आणि शूटिंग करणार्‍या कॅमेरामनशी हुज्जत घातली. मैं भी पत्रकार हँू, सब करके यहाँ आया हू, गुडेवार क्या छे महिने के बाद जानेवाला है, असे म्हणत वाद घातला. चित्रण करण्यास मनाई केली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यावेळी साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे आले, त्यानंतर महापालिकेने इमारतीमधील दोन भिंतींवर हातोडा टाकला.