आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Tatkare Speak About Internal Group ism, News In Marathi

हात जोडून सांगतो, नीट वागा; गटबाजीला इशारा तटकरेंचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहराध्यक्षपदाला स्थैर्य कधी मिळाले नाही. अध्यक्ष बदलले, तशी त्यांची कार्यालयेही बदलत गेली. त्यामुळे गटबाजी उघडपणे दिसायची. विद्यमान अध्यक्ष महेश गादेकर यांनी ही स्थिती रोखण्याचे बर्‍यापैकी प्रयत्न केले. जुन्या कार्यकर्त्यांसह नवकार्यकर्त्यांना स्थान दिले. हे करताना, स्थानिक नेत्यांकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. हीच संधी साधून नेत्यांनी गादेकरांच्या विरोधात प्रदेश कार्यालयाकडे सातत्याने तक्रारी केल्या. शहराध्यक्ष बदलण्यासाठी गट तयार केले. परंतु त्यांचा कावा गादेकरांनी हाणून पाडला. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, येथील नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला. तटकरे तर म्हणाले, ‘‘हात जोडून विनंती करतो. आता तरी नीट वागा. अन्यथा पक्षात थारा नाही.’’ वरिष्ठ नेतेच आवाज चढवल्याने गादेकर विरोधक आता थंड होतील; पण विधानसभा निवडणुकीत कुठली भूमिका बजावतील, सांगता येणार नाही.

पक्षाचा निर्धार मेळावा सोमवारी सोलापुरात झाला. पक्षातील सुंदोपसुंदीवर बंद खोलीत चर्चा होणे अपेक्षित असताना, जाहीर मेळाव्यातच त्याचे इशारे संबंधित नेत्यांना मिळत गेले. त्यामुळे पक्षातील गटबाजीला स्पष्ट इशारा मिळाला. अगदी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यापासून खालपर्यंतच्या नेत्याला तंबी मिळाली. यात गादेकरांच्या मुत्सद्दीपणाला दाद दिली पाहिजे. एवढय़ा तक्रारी प्रदेश पातळीवर जाऊनही संबंधित गटाची दखल नाही, उलट त्यांनाच निर्वाणीचे इशारे मिळाले. ही पक्षातील विरोधकांची नामुष्कीच म्हणावी लागेल. परंतु या घटनेने विरोधकांमध्ये सुधारणा होतील, पक्षशिस्त येईल, असे कुणालाच वाटणार नाही. त्यांच्या कुरापती विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येणार आहेत.
स्वभावदोष कुणाचा?
गादेकर यांनी पक्षातील एकूण चित्र वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले. पक्षवाढीवर बोलताना काही मुद्दे स्पष्टपणे नमूद केले. ते म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांनी शहरासाठी थोडासा वेळ दिला, स्थानिक नेत्यांनी थोडेसे समजून घेतले तर पक्ष वाढेल. हे अपेक्षित असताना तक्रारीच वाढत आहेत. त्याला कदाचित माझा स्वभावही कारणीभूत असू शकेल.’’ गादेकरांच्या प्रांजळ कबुलीचा धागा धरून सोपल म्हणाले, ‘‘आम्ही येऊ पण; तुमचा स्वभाव बदला.’’ दोघांतील या संवादाने कुणाचा स्वभाव बदलला पाहिजे, यावर कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली.