आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणाविरोधी कायदा हे यशच; आता कायदाच चळवळीचे प्रतीक बनेल : मुक्ता दाभोलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हा कायदा होणे हे चळवळीचे प्रतीक आहे. गांधीजींनी एका मुठीत मीठ उचलून समाज एकवटला, तेच काम या कायद्याच्या संमत होण्याने होणार आहे, असे प्रतिपादन स्व. नरेंद्र दाभोलकरांच्या कन्या अँड. मुक्ता दाभोलकर यांनी केले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात अंधर्शद्धा निर्मूलन समिती शहर व जिल्हा शाखेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. या निर्धार मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सगळ्यांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध नोंदविला. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई पन्नालाल सुराणा, अविनाश पाटील (अंनिस कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य), अँड. मुक्ता दाभोलकर, एस. एम. पाटील, तानाजी ठोंबरे, रवींद्र मोकाशी, सुधाकर काशीद उपस्थित होते.

अँड. मुक्ता पुढे म्हणाल्या की, जादूटोणा विरोधी कायदा परिवर्तनवादी चळवळीचे प्रतीक मानाने या धर्मांध शक्तींविरोधीचे हे अस्त्र आहे. या कायद्यासंबंधात जे गैरसमज पसरवले जात आहेत, ते रोखले पाहिजेत. कोणत्याही धर्म आणि धार्मिक भावनेशी चळवळीचा संबंध नाही किंवा विरोध नाही.

करमाळा, मोहोळ, माळीनगर, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, तसेच जिल्हाभरातून समितीचे पदाधिकारी, भाकपचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अँड. गोविंद पाटील यांनी केले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उषा शहा, मधुरा सलवारू, अंजली नानल व कार्यकर्त्यांनी गीते सादर केली.

हे झाले निर्धार
0जोपर्यंत खुनी, मारेकरी व हत्या करण्याचे कारण समोर येत नाही तोपर्यंत लढायचे.
0विवेक व विचाराने हा लढा सुरू ठेवायचा.
0डॉक्टरांचे विचार संस्कारक्षम वयातील शालेय व महाविद्यालयीन स्तरावर पोहोचवायचे.
0संघटितपणाचा तगादा लावला पाहिजे.
0जादूटोणा कायद्याबद्दलचा अपप्रचार रोखण्याचे काम केले पाहिजे.
0या कायद्यासंदर्भात अपप्रचार रोखून पत्रव्यवहार वाढवावा.

निर्धार मेळाव्यात कोण काय म्हटले

सुराणा म्हणाले, की हा कायदा पारित करण्याची जबाबदारी शिंदे आणि पवार या राजकीय मंडळींवर आहे. आपले म्हणणे या नेत्यांपुढे योग्य पद्धतीने मांडण्याची जबाबदारी आपलीच आहे. वेगवेगळ्या पक्षांना या मुद्दय़ाचा आपल्या जाहीरनाम्यात अंतर्भाव करावा, याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

प्रा. पाटील म्हणाले की, चळवळीमध्ये व्यापक प्रमाणावर चर्चा झाली नव्हती. येत्या निवडणुकीच्या अजेंडा व जाहीरनाम्यावर या कलमाचा समावेश होईल. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दाभोलकर हे चळवळीचा चेहरा होते. हा विचार युवापिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

भाई पाटील म्हणाले, जातीय भावना भडकल्यावर धर्मांध शक्ती प्रबळ होतात. डॉ. दाभोलकर यांनी प्राणांची बाजी कोणाची सत्ता यावी यासाठी नाही लावली. देश चालविणारे नेते जिल्ह्याशी संबंधित आहेत. हा कायदा पास झाला नाही तर या नेत्यांना जिल्ह्याच्या हद्दीत येऊ देणार नाही.

मोकाशी म्हणाले की, विचार संपत नसतो, सनातनी, धर्मांध प्रवृत्ती आक्रमक आहेत. या प्रवृत्ती अजून किती आक्रमक होतील? हे सांगता येणार नाही. तरुणांमध्ये प्रबोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन ठासून भरण्याचा प्रयत्न करण्यात यावा.

तानाजी ठोंबरे म्हणाले, वटहुकूम काढणे म्हणजे विधेयक मंजूर झाले या भ्रमात राहू नये. समग्र परिवर्तनाच्या लढय़ात सगळ्यांनी सामील होणे गरजेचे आहे. धर्मांध विचाराची माणसे म्हणजे व्हायरस आहेत. त्यांच्यापासून सावधान राहावे.

गो. मा. पवार म्हणाले ही, अंधर्शद्धा सनातन काळापासून सुरू झाली आहे. ती विश्वाचे रहस्य काय आहे? हे न कळल्यामुळे आहे. त्याची पाळेमुळे शोधून उखडून काढली पाहिजेत.

वाचनालयाचे कार्यवाह दत्ता गायकवाड म्हणाले की, सत्यशोधक समाजाचे काम जसे महात्मा फुलेंनी केले तेच डॉक्टरांनी केले. सत्ताधार्‍यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे.