आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी जाणून घेतल्या विडी कामगारांच्या व्यथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विडी कामगारांच्या गोदुताई नगरात खासदार सुप्रिया सुळे यांचे मंगळवारी सायंकाळी आगमन झाले. त्यांच्या समोर स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात सामूहिक शपथ घेण्यासाठी सुमोर दोन हजार महिला जमलेल्या. हातात विड्या वळण्याचे काम सुरूच होते. सौ. सुळे व्यासपीठावर गेल्या. समोरील दृश्य पाहून त्या क्षणात खाली उतरल्या. संयोजकांना काही कळण्याच्या आतच त्या विडी कामगार महिलांमध्ये जाऊन बसल्या. अरुणा भंडारी नावाच्या तरुण कामगार महिलेशी त्यांनी गप्पाच सुरू केल्या. त्यांच्या व्यथा ऐकून त्या व्यासपीठावर आल्या. शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर बोलताना सुळे यांनी जाहीर केले, तुमची यातून सुटका करू..
मुख्य कार्यक्रमाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यामुळे संयोजक माजी आमदार नरसय्या आडम आश्चर्यचकित झाले. सुळे यांच्या स्वागतासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार तयारी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा लाल शर्टातील कार्यकर्ते सलामी देण्यासाठी उभे होते. लाल साडीतील महिलाही सज्ज होत्या. त्या आल्या, फटाके फुटले, हार गळ्यात घालण्यास नकार देत त्या पुढे निघाल्या, व्यासपीठावर गेल्या. व्यासपीठावरून उतरून कामगारांत सहभागी झाल्या. हातात पान घेऊन त्यात तंबाखू भरत भिरभिर वळणार्‍या हातांकडे पाहून त्या हरखून गेल्या. ज्येष्ठांशी बोलल्या. युवतींशी बोलल्या.
या वेळी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर आदी उपस्थित होते.
विडी कामगार अरुणा भंडारी यांच्याशी सुळे यांच्या गप्पा
सुळे : किती मजुरी मिळते
भंडारी : नव्वद रुपये
सुळे : काही त्रास. भंडारी : कारखानदार, कर्मचारी त्रास देतात. छाट विड्या काढतात, उर्मट बोलतात.
सुळे (व्यासपीठावरून) : यापुढे कुणी त्रास दिला तर आमच्या शहराध्यक्षांना (संतोष पवार आणि किसन जाधव यांना पुढे करून) भेटा. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे.