आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तेवरच होणार युवतींची निवड - सुप्रिया सुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध पदांसाठी कामाच्या गुणवत्तेवरच युवतींची निवड होणार आहे. त्या वेळी ती कोणाची मुलगी आहे, हे पाहिले जाणार नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्यात केले.

मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात मेळावा झाला. राज्यातील विविध भागातील युवतींशी दिलखुलास संवाद व त्यांच्या समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. त्या म्हणाल्या की, कोण कोणाची मुलगी आहे यापेक्षा कोण कसे काम करते आणि त्यांच्या कामाचे मोल काय याची पारख पक्ष करणार आहे. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पदांची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांचे कौतुक - डॉ. उपासेंच्या प्रकरणात पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, पण सोलापूरचे हे उदाहरण त्यास अपवाद ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. युवती मंचचे काम कार्यकर्तेच करतील. त्याचा बोजा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर देणार नाही. मंचची गरज असेल तेथे युवतींनी निडर होऊन उभे राहावे, असेही सौ. सुळे यांनी सांगितले.
असा घडला सुसंवाद - अँड. सरोजनी तमशेट्टी या युवतीने कायद्याच्या अंमलाचा प्रश्न उपस्थित केला. अश्लेषा चौगुले अनगर (ता. मोहोळ) हिने येथे मेळावा घेण्याची सूचना केली. खेळाची मैदाने फक्त पुरुषांसाठीच आहेत. तेथे जाण्यास संकोच होतो. तसेच तेथे मुले असल्यामुळे घरचे पाठवण्यास मनाई करतात. मग, गुणवत्ता असूूनही आम्हा मुलींना घरी बसावे लागते, असा मुद्दा भुवनेश्वरीने मांडला. यावर सौ. सुळे यांनी क्रीडांगणावर वेळेचे नियोजन करून युवक-युवतींना 50-50 टक्के जागेचे वाटप करावे, असे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांना सूचविले. प्रीती कोरे, रेश्मा सातारकर, हर्षदा बचुटे, पूजा कांबळे, अमृता जाधव, प्रतिज्ञा सावळकर, विशाखा पवार, कोमल लोले, सायली शेंडगे, रूपा अंधारे, अमृता मेहता, सायली भोजने, स. पा. मडकी, रेश्मा कारभारी यांनी विषय मांडले.
भेद का - मुलगा महत्त्वाचा वाटतो, पण मुलगी नाही. वंशाचा दिवा महत्त्वाचा. पण, दोन्ही घरी प्रकाश देणारी पणती नको, हे असे का? कोणत्याही क्षेत्रात मुली मागे नाहीत. तरीही मुलगी नकोच, ही मानसिकता पहावयास मिळते, असे मत बहुतांश युवतींनी व्यक्त केले.
अवतरल्या सवित्रीबाई - सातार्‍याची बालकलाकार शिवानी म्हेत्रे हिने ‘होय, मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. गंधर्व साळुंके याने ‘मला बहीण पाहिजे’ या विषयवर व्याख्यान दिले.