Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Surekha Shah's Rani Abbakadevi Book Publication Ceremony

राणी अब्बकदेवी, होळकर या तर कर्तृत्वाची उमललेली फुले

भारतीय स्त्रियांचे कर्तृत्व केवळ चूल आणि मुल यांच्यापर्यत मर्यादित नव्हते. राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून ते राणी अब्बकदेवी यांच्यापर्यंत सर्वच स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

प्रतिनिधी | Jun 01, 2015, 10:56 AM IST

  • राणी अब्बकदेवी, होळकर या तर कर्तृत्वाची उमललेली फुले
सोलापूर-भारतीय स्त्रियांचे कर्तृत्व केवळ चूल आणि मुल यांच्यापर्यत मर्यादित नव्हते. राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून ते राणी अब्बकदेवी यांच्यापर्यंत सर्वच स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. ही उमललेली कर्तृत्वाची फुले असल्याचे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात रविवारी सांयकाळी जोहडकार सुरेखा शहा यांच्या राणी अब्बकदेवी पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गो. मा. पवार, कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, इतिहास संशोधक अॅड. आनंद देशपांडे, चंद्रमोहन शहा आदी उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, "राणी अब्ब्कदेवी यांचे हे पुस्तक म्हणजे उत्तम चरित्र उत्तम कादंबरीचा सुरेख संगम आहे. ही कादंबरी लिहिणे खूप अवघड आहे. कारण राणी अब्ब्कदेवी यांच्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शहा यांनी लिहिलेले हे पुस्तक खूप सुंदर आहे. राणी अब्ब्कदेवी यांनी लढाईवेळी नवनवीन शास्त्रांचा शोध लावून पोर्तुगीजांचा पराभव केला आहे. अशा पराक्रमी स्त्रीचे चरित्र हे तरुणांपर्यंत येणे खूप गरजेचे आहे. शहा यांनी पुस्तकासाठी घेतलेली मेहनत खूपच प्रशंसनीय आहे. जोहडसाठी राजस्थान तर अब्ब्कदेवीसाठी कर्नाटकपर्यंतचा परिसर त्यांनी अभ्यासला आहे. यावरून शब्दाला प्रेमाला ना जातीचे ना धर्माचे राज्याचे बंधन नसते. हेच दिसून येते. प्रास्ताविक चंद्रमोहन शहा यांनी केले. सूत्रसंचालन शोभा बोल्ली यांनी केले.
अब्बकदेवी यांच्यावर संशोधन हवे
डॉ. देशपांडे म्हणाले की, राणी अब्बकदेवी यांच्या पराक्रमाचा इतिहास खरोखरच थक्क करणारा आहे. भारताच्या इतिहासात अनेक स्त्रियांनी पराक्रम गाजवला आहे. १५४४ ते १६२३ या कालखंडातील राणी अब्ब्कदेवींचे कार्य खूप कमी लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांच्यावर आणखी संशोधनाची गरज आहे. त्यातून त्यांच्या कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, असे देशपांडे यांनी सांगितले.

Next Article

Recommended