आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर खंडपीठाचा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांनी टाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर खंडपीठाचा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांनी टाळला. शनिवारी सोलापूर बार असोसिएशन शतकोत्तर महोत्सव कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या विषयावर ते ठोस आश्वासन देतील अशी अपेक्षा असताना या प्रश्नावर त्यांनी बोलणेच टाळले. यामुळे कार्यक्रमास उपस्थित वकिलांची निराशा झाली.

आसरा चौकातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये शतकोत्तर महोत्सव कार्यक्रम थाटात झाला. बारच्या वेबसाइटचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य जिल्हा न्यायाधीश अश्विनकुमार देवरे, जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे, बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके, उपाध्यक्ष संतोष न्हावकर, सचिव महेश जगताप, सहसचिव स्वाती बिराजदार, खजिनदार अमित आळंगे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्तावनेत घोडके यांनी वकिलांसाठी हाउसिंग सोसायटी योजना, ई लायब्ररी, वकिलांसाठी चेंबर, अँडव्होकेटस् कंझुमर सोसायटी, सोलापूरसाठी खंडपीठ व्हावे ही मागणी केली. या मागण्यांबाबत बोलताना शिंदे यांनी आपल्या भाषणात, मी पंचवीस वर्षांपूर्वी राज्यात विधी व न्यायमंत्री असताना सोलापूर बेंचसाठी रिप्लाय दिला होता, असा उल्लेख करत बारच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल असे सांगितले. पण, सोलापूरला खंडपीठबाबत त्यांच्याकडून ठोस माहिती अथवा घोषणा काही ऐकायला मिळाली नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले. आभार अँड. आळंगे यांनी मानले.

नव्या पिढीला प्रेरणा : देवरे
आजचा कार्यक्रम नेटका आणि सुंदर झाला. नव्या पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरेल. सोलापुरातील वकिलांचे काम चांगले आहे. त्यांचे मला सहकार्य मिळते. पुरावा आणि कायदाच्या चौकटीत राहून न्यायदान होते. पुराव्यांचा साकल्याने वकिलांनी विचार करावा, असे देवरे म्हणाले.

मुख्य जिल्हा न्यायाधीश देवरे यांनी लातूरप्रमाणे आधुनिक बार लायब्ररी सोलापुरात व्हावी यासाठी शिंदे यांनी प्रयत्न करावेत, असे भाषणात सांगितले. तोच धागा पकडून शिंदे यांनी घोडके यांचे काम न्यायाधीशांनी केले आहे. म्हणजे न्यायालय व बार यांचे काम एकाच ट्रॅकवरून सुरू आहे. एकत्रित काम केल्यास समाज एक होतो. नवा विचार समोर येतो. धर्म आणि कर्म यांची सांगड घालून काम केल्यास वैभव वाढते.

ज्येष्ठ वकिलांचा सत्कार
के. एल. तुळसे, व्ही. एम. विश्वरूपे, जे. ए. कस्तुरे, डी. एस. चव्हाण, जी. एस. आडम, आय. व्ही. साखरे या वकिलांचा सत्कार झाला. वेबसाइटचे काम केल्याबद्दल मनोहर जिंदम व तालुका बार अध्यक्षांचाही सन्मान झाला. न्यायाधीश मंडळींसह सुमारे सहाशे वकील, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, राजशेखर शिवदारे यांची उपस्थिती होती.

उद्घाटन अन् स्मरणिका प्रकाशन
शतकोत्तर सोहळ्याचे उद्घाटन व स्मरणिका प्रकाशन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थित करण्यात आले. दयानंद लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य यू. मंगापती राव प्रमुख पाहुणे होते. यावेळी गुडेवार यांनी वकिलांच्या गृहप्रकल्पासाठी जागा उपलब्ध करू असे सांगितले. कार्यक्रमास बी. डी. कठ्ठे, व्ही. डी. फताटे, विद्यावंत पांढरे, उमेश भोजने, गुरुदत्त बोरगावकर, दत्ता पवार, हेमा शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.