आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वकीयांकडूनच घात, सुशीलकुमार शिंदे यांचे राष्ट्रवादीवर संधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘सोलापुरात माझ्या सीटला स्वकीयांकडूनच धोका असल्याचा अहवाल गुप्तचर खात्याकडून आधीच मिळाला होता. त्यामुळे मी 12 दिवस मतदारसंघात तळ ठोकून होतो, तरीही पराभवाला सामोरे जावे लागले,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपल्या पराभवाचे खापर अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर फोडले. नेमक्या कोणामुळे व कोणत्या कारणामुळे पराभव झाला हे सत्यशोधन समितीच्या पाहणीतून समोर येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रथमच शिंदे यांनी सोलापुरात येऊन माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच आता मी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे, असे सांगत होतो, मात्र आतापर्यंत पक्षाने देईल ती जबाबदारी पार पाडल्याने याही वेळी पक्षर्शेष्ठींच्या आदेशानुसार निवडणूक लढवली असल्याचे शिंदे म्हणाले.
चिंतन बैठकीत सोलापुरातील कॉँग्रेसच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, अशा घटना चुकीच्या आहेत. पक्षाचे काम करताना गट-तट बाजूला ठेवून काम करावे. विधानसभा निवडणुकीत तरी एकत्रितपणे काम केल्यास यश दूर नाही.

दंगलीवर अंकुश आणला
केंद्रीय गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण घुसखोरी, नक्षलवाद व देशांतर्गत दंगली रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दहशतवादी कारवाया व घुसखोरीला अंकुश लावत प्रमुख अतिरेक्यांना पकडण्यात यश आले. नक्षलवाद रोखण्यासाठी संबंधित राज्यात पोलिसांनी प्लॅन तयार केला असल्याचेही शिंदे म्हणाले.

शहरवासीयांच्या समस्या, एलबीटीची नाराजी भोवली
गेली 40 वष्रे विजयी करून सोलापूरकरांनी मला राज्यात व केंद्रात अनेक पदे दिली आहेत. एका पराभवाने मी नाराज न होता पुन्हा एकदा येथील लोकांसाठी काम करत राहीन. निवडणूक म्हटली की जय-पराभव असतोच. शहरवासीयांच्या समस्या, एलबीटीला विरोध आदी कारणांमुळे स्थानिकांची नाराजी होती. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही आमदार, नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे शिंदे म्हणाले.

खासदार बनसोडे यांना शुभेच्छा
मी जिल्ह्यात बोरामणी विमानतळ, एनटीपीसी, बीएसएफ, सीआयएसएफ दलाची प्रशिक्षण केंद्रे आणली आहेत. सत्ता गेली वा मी पराभूत झालो असलो, तरी हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील, ती पूर्ण होण्यासाठी मी लक्ष घालणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. नवनिर्वाचित खासदार शरद बनसोडे यांनाही शुभेच्छा दिल्याचे ते म्हणाले.

नेतृत्वबदल राज्यात नको
‘विधानसभा निवडणुका व दोन चव्हाणांमधील मतभेद पाहता राज्यात नेतृत्वबदल आवश्यक आहे का ?’ या प्रश्नावर शिंदे यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘सध्या राज्यात नेतृत्वबदलाची काहीच गरज नाही. मी पक्षाचा आदेश मानणारा असल्याने पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करेन,’ असे सांगत राज्यात येण्यास आपण इच्छुक नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘ती’ देशासाठी चांगली गोष्ट..
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना शपथविधीसाठी बोलावले, ही देशासाठी चांगली गोष्ट आहे. आपणास देशाची प्रगती करायची असेल, तर शेजारील राष्ट्रांबरोबर चांगले संबंध ठेवावे लागतात. त्याचाच एक भाग म्हणून मोदी यांनी सर्व प्रमुखांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावले,’ असे शिंदे म्हणाले.