आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिकडे अण्णा, तिकडे आम्ही! कोठेंच्या समर्थकांची भूमिका; शिवसेनेतून शिंदे यांना आव्हान देण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करून कुठल्याही पक्षात जाण्याचे संकेत देणाºया महापालिकेतील सभागृह नेते महेश कोठे यांच्या सोबत नगरसेवकांचा मोठा गटही जाण्याच्या तयारीत आहे. इतकेच नव्हे, तर आमदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व मानणारे काही नगरसेवकही कोठेंच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. तसे झाल्यास महापालिकेतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा दारुण पराभव झाला. त्याचे खापर कोठे पिता-पुत्रांवर फोडले जात आहे. ‘40 वर्षे एकनिष्ठ राहूनही बदनामीच वाट्याला आली,’ असे सांगत महेश कोठे यांनीही पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, राज्यातील सरकारात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्रिपदी श्री. शिंदे यांची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे कोठे सावध झाले आणि त्यांचा पक्षांतराचा विषय मागे पडला. मात्र, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर पडदा पडला. त्यामुळे कोठेंच्या पक्ष सोडण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ल्याचे दिसते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा मोट बांधण्यास सुरवात केली. ‘जिथे अण्णा, तिथे आम्ही’ म्हणत कोठे यांची ‘राधाश्री’ या निवासस्थानी भेट घेत आहेत.
...तर शिवसेनेचा असेल महापौर
कोठे यांना शिवसेनेने पक्षात सन्मानाचे स्थान दिले तर बदल्यात महापालिकेतील काही पदे शिवसेनेला मिळू शकतील. पक्षांतरामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढल्याने अगदी महापौर पदही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही तरी महापौरपद कोठे गटाकडेच आहे. देवेंद्र कोठे किंवा चेतन नरोटे महापौरपदाचे दावेदार मानले जातात. त्यांना बाजूला सारून शिवसेनेला महापौर पद देत शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळवण्याची खेळी कोठे करू शकतील. शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तेथून ते निवडणूक लढवू शकतील. तसे झाल्यास प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे राहात एका अर्थाने ते सुशीलकुमार शिंदे यांना थेट आव्हान देतील.
कोठेंचे बळ; 15 नगरसेवक
चेतन नरोटे, देवेंद्र कोठे, विनायक कोंड्याल, जगदेवी नवले, विठ्ठल कोटा, श्रुती मेरगू, निर्मला नल्ला, मधुकर आठवले, कुमुद अंकारम, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना यादव, दत्तू बंदपट्टे, राजा खराडे (स्वीकृत) आणि स्वत: कोठे. असे एकूण 15 नगरसेवक.
महापालिकेत हव्यात सत्तेसाठी किमान 53 जागा
महापालिकेत बहुमत मिळवण्यासाठी 53 जागा आवश्यक असतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. त्यातून कोठे जर समर्थकांसह बाहेर पडले तर ही सत्ता अल्पमतात येईल. भाजप-शिवसेनेला हा गट मिळाला तर त्यांची संख्या 48 होईल. आणखी पाच जणांना घेऊन सत्तेची सूत्रे ताब्यात घेणे शक्य आहे. आमदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व मान्य करणारे काही नगरसेवक येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
ठिणगी तर पडलीच...
लोकसभा निवडणुकीतील शिंदे यांच्या पराभवानंतर पक्षाच्या पदाधिकाºयांनी प्रदेश समितीकडे राजीनामे दिले. शहराध्यक्ष धर्मा भोसले यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर प्रकाश यलगुलवार अध्यक्ष झाले. त्यानंतर लगेच पालिकेतील पक्षनेते बदलण्याच्या हालचाली झाल्या. आरिफ शेख यांच्या गळ्यात ही माळ पडणारच होती; परंतु कोठे यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. संघर्षाची पहिली ठिणगी इथे पडली.
तात्या दूरच...
सुशीलकुमार शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे या चर्चेपासून दूर आहेत. त्यांचा सध्याचा मुक्काम हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलमध्ये आहे. राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलची शाखा येथील केकडेनगरमध्ये त्यांनी सुरू केली आहे. या शाळेच्या सुशोभीकरणाकडे त्यांनी लक्ष पुरवले. सकाळी आले, की संध्याकाळीच ते घरी परत जातात, असा त्यांचा दिनक्रम आहे.
पालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस 46
राष्ट्रवादी 17
भाजप 25
शिवसेना 08
माकप 03
बसप 03
रिपाइं 01
अपक्ष 01
एकूण 102