आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Lok Sabha Election

शिंदे म्हणाले, ‘जा म्हणेपर्यंत थांबणार्‍यांपैकी मी नाही..’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘आज माझं वय 73 वर्षे आहे. तेवढं वय वाटत नसलं तरी मला त्याची जाणीव झाली आहे. लोकांनी जा म्हणेपर्यंत थांबणार्‍यांपैकी मी नाही’, असे सांगत ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सूतोवाच सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सोलापूरचा जो काही विकास झाला तो आपल्यामुळेच, अशा आशयाच्या वाक्यांची शिंदे यांनी वारंवार उजळणीही केली.
शहरातील विविध व्यापारी संघटनांशी कॉंग्रेसचे उमेदवार शिंदे यांनी हेरिटेज येथे संवाद साधला. ‘सोलापूरचा जो काही विकास झाला तो आजपर्यंत आपण मला दिलेल्या संधीमुळेच. यामुळे 17 एप्रिल रोजी हात चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करावे’, असे आवाहनही शिंदे यांनी केले. ‘सर्वांगिण विकासाबाबत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संवाद’ या नावाने ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीचे प्रास्ताविक पराग शहा यांनी केले.
माझ्या सहकार्‍यांनो, अशी भाषणाची सुरुवात करत शिंदे म्हणाले, ‘आपणामुळे मी इथंपर्यंत (सभागृह नेता आणि केंद्रीय गृहमंत्री) पोहोचलो आहे. 1952 ते आजचा देश पाहता खूप मोठा बदल झाला आहे. हा विकास नाही का? देशाचा विकास होण्यासाठी देशात स्थिर सरकारची गरज आहे. शेजारील देशांमध्ये स्थिर सरकार नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट असल्याचे चित्र आहे. गेल्या 10 वर्षांत आम्ही देशाचा विकास दर 4.50 टक्के राखण्यात यश मिळवले.’
या वेळी जितेंद्र राठी, डॉ. राजीव प्रधान यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सुशीलकुमार शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. बैठकीस यतीन शहा, किशोर चंडक, केतन शहा, पेंटप्पा गड्डम यांच्यासह व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुमच्या प्रश्नावर एक दिवस आपण बसू
एलबीटी रद्द करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलने करून मेटाकुटीला आलेल्या व्यापार्‍यांना मंगळवारी थोडा दिलासा मिळाला. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी व्यापार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला. ‘तुमच्या प्रश्नावर आपण एक दिवस बसू’ असे आश्वासन त्यांनी दिले. विविध समाजघटकांचे मेळावे घेऊन नाराजीची भावना दूर करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे.