आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Sharad Bansod, Divya Marathi

सोलापुरात शिंदेंसमोर पुन्हा शरद बनसोडेच प्रतिस्पर्धी,मोदी लाट भाजपला तारणार काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघात परंपरेने होत असलेली काँग्रेसविरुद्ध भाजप ही लढत या वेळीही पाहायला मिळणार आहे. गेल्या 40 वर्षांत विजयाची परंपरा राखणा-या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध भाजपने शरद बनसोडे यांनाच पुन्हा रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात एकीकडे सुशीलकुमारांचा प्रभाव रोखण्यासाठी भाजपला मोदी लाटेचा आसरा घ्यावा लागणार असेच दिसते आहे.


1951 पासूनच्या सोलापूर मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर 13 वेळा काँग्रेसने, तीन वेळा भाजपने, तर केवळ एकवेळा शेतकरी कामगार पक्षाला निवडणुका जिंकता आल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने ज्या ज्या वेळी निवडणुका जिंकल्या, त्या 72 हजार ते दोन लाखांच्या फरकाने, तर विरोधी पक्षाने सहा हजार ते 1 लाखांपर्यंतच्या फरकाने जिंकल्या आहेत. 2009 मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यात शिंदे यांना 3 लाख 87 हजार, तर भाजपचे बनसोडे यांना 2 लाख 87 हजार अशी मते मिळाली होती. बसपाचे प्रमोद गायकवाड यांना केवळ 30 हजार मते मिळाली होती. यंदा बसपाने उमेदवार बदलला आहे.
काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीने जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांत एकजुटीने काम करण्याचा प्रयत्न या वेळीही केला आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. सोलापुरात काँग्रेसला राष्‍ट्रवादीची, तर माढ्यात राष्‍ट्रवादीला काँग्रेस व शेकापची मदत हवी आहे. गेल्या वेळी सर्वच विधानसभा मतदारसंघांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. अक्कलकोट तालुक्यात मात्र काटे की टक्कर झाली होती. मोहोळ आणि मंगळवेढा व पंढरपूर या राष्‍ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या तालुक्यांतून शिंदे यांचे मताधिक्य सर्वाधिक होते. या वेळी ते किती टिकवले जाते आणि अक्कलकोट, उत्तर सोलापूर या भाजपचे वर्चस्व असलेल्या तालुक्यात काँग्रेसची परिस्थिती कशी राहते, यावरही बरेच काही अवलंबून आहे.
गेल्या पाच वर्षांत शिंदे यांनी आणलेल्या काही योजनांमुळे वातावरण अनुकूलता असल्याचा प्रचार काँग्रेसकडून सुरू आहे. तसेच गेल्या 40 वर्षांत आजवर कधीही पराभव न पाहिलेल्या शिंदे यांचा मतदारसंघातील प्रभाव ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्‍ट्रवादीचीच सत्ता आहे. त्यामुळे गाव आणि वॉर्डावॉर्डांत पोहोचणे काँग्रेसला शक्य होत आहे; परंतु केंद्र व राज्यातील सरकारविरोधात सामान्यांच्या मनातील असंतोष व एलबीटीविरोधी व्यापा-यांची भूमिका यामुळे काँग्रेसला विजयासाठी झगडावे लागेल, हे मात्र खरे.
रिपाइंचे पाठबळ बनसोडेंना मिळेल?
गेल्या वेळी शरद बनसोडे यांनी अगोदरपासूनच जोरदार तयारी केली होती. चित्रपट निर्मिती, सावरकर विचार मंचाद्वारे ते चर्चेत आले होते. शिवाय सोलापुरात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे पावणेतीन लाखांच्या वर मते ते मिळवू शकले. या वेळी आपण लढणार नाही, अशी घोषणा बनसोडेंनी केली होती. मात्र शिंदेंविरोधात दुसरा तगडा उमेदवारी न मिळाल्याने पक्षाने पुन्हा बनसोडेंनाच रिंगणात उतरविले. या वेळी महायुती असल्याने रिपाइंची ताकद बनसोडे यांच्या पाठीशी किती येते, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
बहुजन समाज पक्षाकडून संजीव सदाफुले, आम आदमी पार्टीकडून ललित बाबर यांचीही उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना उमेदवार उभा करणार का, याचीही उत्सुकता आहे. एकूणच सोलापूरचे राजकारण ढवळून निघणार आहे. शिंदे हे केंद्रीय गृहमंत्रिपदावर असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे.
सुशीलकुमार यांची बलस्थाने
एनटीपीसी, सोलापूर-पुणे महामार्ग यामुळे विकासाची आशा, शरद पवारांशी जवळीक, केंद्र, राज्यात सत्तेत मोठी पदे सांभाळल्याने निर्माण झालेली वजनदार नेत्याची प्रतिमा.
उणिवा : एलबीटीमुळे व्यापा-यांची नाराजी, रिपाइंमुळे महायुतीकडे जाणारी मते, शहराचा सर्वांगीण विकास न झाल्याचा विरोधकांचा आक्रमक प्रचार याचाही फटका बसू शकतो.
अ‍ॅड. बनसोडे
यांची बलस्थाने
अभिनेता, चित्रपट निर्माता म्हणून असलेली प्रतिमा. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव. भाजपला मानणारा वर्ग. शहर उत्तर व अक्कलकोटमध्ये भाजपचे वर्चस्व.
उणिवा : भाजपची विस्कटलेली संघटनात्मक ताकद. गेल्या निवडणुकीनंतर घटलेला जनसंपर्क. महायुती असली, तरी मित्रपक्ष अजूनही सक्रिय नसणे. माजी खासदार सुभाष देशमुख यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो.