आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Solapur Lok Sabha Constituncy, Divya Marathi

चौथ्यांदा दिल्लीत जाण्याची शिंदेंची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - देशाचे लक्ष लागलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतदानाला फक्त 24 तास उरले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रचारात तेवढा उत्साह दिसत नाही. काँग्रेसने उमेदवार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेच सेलिब्रेटी आहेत, दुसरे कशाला? असा पवित्रा घेऊन स्थानिक पातळीवर प्रचार सुरू केला तर विस्कळीत महायुतीने नरेंद्र मोदींच्या सभेच्या लाटेवर स्वार होणे पसंद केले. आम आदमी पार्टीला डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने तसेच बहुजन समाज पक्षामुळे मतविभागणी कशी होते? याकडे आता लक्ष लागलेले आहे.


गृहमंत्री शिंदे नऊ एप्रिलपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी आतापर्यंत मतदार संघातील वेगवेगळे समाज घटक , उद्योजक, वकील, पक्षाचे नगरसेवक आदींच्या स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत. ग्रामीण भागात त्यांनी गावभेटी आणि प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या सात रस्ता येथील जनवात्सल्य बंगल्यात नाराजी दूर करणे, अडचणी समजावून घेणे, प्रचार यंत्रणेचा आढावा घेणे, भेटण्यास आलेल्यांशी चर्चा करणे असा त्यांचा दररोजचा निवडणूक काळातील दिनक्रम राहिला. मोदी यांच्या भाषणानंतर त्यांचे मुद्दे खोडून काढण्यावर भर आहे.


शिंदे यांना दुसर्‍यांदा आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार शरद बनसोडे पहिल्या दिवसापासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी निम्मा दिवस शहरात तर निम्मा ग्रामीण भागात असा प्रचार सुरू केला. शिवसेना आणि रिपाइंची तेवढी साथ मिळत नसल्याने जे येतील त्यांना घेऊन निघणे असा त्यांचा प्रयत्न राहिला. घरोघर जाऊन आपली माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची एक स्वतंत्र यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केली. नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेनंतर महायुतीच्या प्रचारास गती येईल असे वाटत होते. पण, अजूनही ते जमलेले नाही. नरेंद्र मोदींचा प्रभाव मात्र जाणवत आहे. त्याचा फायदा होईल अशी त्यांना आशा आहे. सोलापुरातील रस्ते, बंद पडलेले उद्योग, स्थानिक संस्था कर, वाढत जाणारी बेरोजगारी, नरेंद्र मोदींचा प्रभाव हे मुद्दे त्यांच्या प्रचारात दिसत आहेत.


आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पक्षामुळे होणार्‍या मतविभागणीकडेही लक्ष लागलेले आहे. आम आदमी पार्टीला डाव्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे बळ आले आहे. आम आदी पक्षामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार आहे.असे होणे काँग्रेसला अडचणीची ठरणार अशी चर्चा आहे. तर बहुजन समाज पक्षाचे अँड. संजीव सदाफुले‘ एकटा चलो रे’च्या भूमिकेत आहेत.


विविध घटकांची अशी आहेत मते
शेतकरी : उजनी धरणातील पाणी अक्कलकोटपर्यंत आले पाहिजे अशी त्या तालुक्यातील शेतकर्‍यांची खूप दिवसांची अपेक्षा आहे.
उच्च्शिक्षित : सोलापुरात विमानतळ व्हावे, दळणवळणाची साधने वाढली पाहिजेत, सुविधा वाढल्या पाहिजेत, असे उच्च्शिक्षितांना वाटते.
उद्योजक : स्थानिक संस्था कर आणि त्यातील जाचक अटी हटल्या पाहिजेत, एकच कर लागू केला पाहिजे, असे व्यापार्‍यांना वाटते.
विद्यार्थी : विद्यापीठाचा दर्जा सुधारला पाहिजे, सोलापुरात उद्योग आले पाहिजेत व आयटी क्षेत्र निर्माण झाले पाहिजे या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा.


सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
सकारात्मक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकजूट
सोलापूर शहरात आजवर झालेली विकास कामे
केंद्रीय स्तरावर गृहमंत्री, प्रदीर्घ अनुभव, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते
नकारात्मक
न वाढलेला उद्योग, एलबीटीचा वाद
शहरातील विस्कळीत होत असलेला पाणीपुरवठा
उजनी पाण्याचा अक्कलकोट, दक्षिण व उत्तरसाठी फायदा न होणे


शरद बनसोडे (भाजप)
सकारात्मक
भाजपला म्हणून मिळणारी मते यावेळीही पाठीशी राहण्याचा विश्वास
सोलापूरच्या विकासाबाबत मतदारांमध्ये नाराजी
नरेंद्र मोदींचा जनमानसावर असलेल्या प्रभावाचा फायदा
नकारात्मक
महायुतीत पाच पक्ष असतानाही इतर पक्षांची नसलेली साथ
शिंदेंच्या तुलनेत उमेदवार म्हणून तेवढा प्रभाव नाही
भाजपतच पक्षांतर्गत गट, तटामुळे प्रचारात मागे