आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार माझे राजकीय गुरू : सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘‘पवार आणि माझ्यात काही होते का..? काही नसताना पत्रकार काही तरी उठवतात. खरे तर पवार माझे गुरू. त्यांनीच मला आणले राजकारणात. आता दोघांनीही सत्तरी ओलांडली. आयुष्याच्या शेवटी तरी कसले वैर असणार?’’ अशी प्रांजळ भूमिका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी येथे मांडली. त्यांच्या भावनांवर फुंकर घालताना पवार यांनी, राजकीय आशा आणि आकांक्षेसाठी मतभेद असतात. काही गोष्टी जाहीरपणे बोलताही येत नसतात, असा खुलासा केला. निवडणुका अद्याप लांब असताना, दोघांच्या राजकीय विधानांनी सोलापूरकर मात्र चकित झाले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या येथील कार्यालय उद्घाटनासाठी पवार आणि शिंदे आले होते. सभा सुरू झाल्यानंतर जोरदार पावसालाही सुरुवात झाली. शामियान्यात ठिकठिकाणी गळती सुरू झाली; परंतु दोघा दिग्गजांच्या टोलेबाजीकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. टोलेबाजीला शिंदेंनीच सुरुवात केली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकांच्या काळात पवारांनी माझ्यावर टीका केल्यासंबंधी पत्रकार विचारायचे. त्यांना उत्तर देताना मी म्हणायचो, ते माझे गुरू आहेत. त्यांच्याकडूनच मी खूप काही शिकत आलो.’’

शिंदेंच्या विधानाकडे लक्षपूर्वक ऐकत पवार म्हणाले, ‘‘व्यापक राजकारणासाठी मतभेद असतात; परंतु राजकारण विकासाचे असावे लागते. सामान्यांना उद्ध्वस्त करणारे राजकारण कुठल्या कामाचे? ज्यांनी आपल्याला मोठे केले. त्या मतदारांप्रती काही देण्याच्या इच्छेने राजकारण करावे. आज आम्ही केंद्रात आणि राज्यात एकत्र काम करतो. ते याचसाठी.’’

आदर्शचा निर्णय मान्य
मुंबईतील आदर्श गृहनिर्माण संस्थेबाबत प्रवीण वाटेगावकर यांनी आपल्याला आरोपी करा म्हणून याचिका दाखल केली आहे. यावर शिंदे म्हणाले,न्यायालयास न्यायदानाचा अधिकार आहे. त्यामुळे यात मी दोषी आढळल्यास मला न्यायालयाचा निर्णय मान्य असेल.