आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swabhimani Agitation Before District Bank On Thursday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा बँकेसमोर गुरुवारी ‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे वाटप केलेल्या कर्जामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांना पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 13 फेब्रुवारीपासून सोलापूर येथील बँकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. खोत म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाने खिरापतीप्रमाणे आपापसात बेकायदेशीरपणे कज्रे वाटली आहेत. यात संचालक व कारखानदारांनी स्वार्थ साधला आहे. मी शेतकर्‍यांना जनावरे खरेदी करण्यासाठी हमीपत्र दिल्याने माझ्यावर धुळय़ात गुन्हा दाखल केला. मात्र, ज्यांनी जिल्हा बँकेला दिवाळखोरीच्या दिशेने नेले ते संचालक मात्र, उजळमाथ्याने फिरत आहेत. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संजय पाटील - घाटणेकर, प्रा.जयंत बगाडे, दीपक भोसले हे उपोषण करणार आहेत.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखवावे. बँकेच्या संचालक मंडळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बँकेला बुडवायचे बाकी ठेवल्याचा आरोप खोत यांनी केला. तसेच आसुडाची वादी तेलात मुरायला ठेवली आहे. ते मुरल्यानंतर ते कसे असते, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळेल, असे त्यांनी म्हटले. पवारांनी स्वाभिमानीच्या आसुडाला वादी कुठे आहे, असा सवाल केला होता. आगामी निवडणुकीत बँकेच्या संचालक मंडळातील नेत्यांना धूळ चारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस संजय पाटील-घाटणेकर, प्रा.जयंत बगाडे, दीपक भोसले, विष्णूपंत बागल, माउली हळणवर उपस्थित होते.
अद्याप कारवाई नाही
बँकेच्या टेंभुर्णी शाखेत तत्कालीन शाखाधिकारी रविकांत मारुतराव बागल यांनी 10 कोटी 57 लाखांचा गैरव्यवहार केला. मात्र, त्यांचे वडील आमदार बबनराव शिंदे यांच्या साखर कारखान्याचे संचालक असल्याने अद्याप कारवाई झाली नसल्याचे खोत यांनी म्हटले.
बँकेत अनियमितता नाही
बँकेत कोणतीही अनियमितता नाही. तसेच टेंभुर्णी गैरव्यवहारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. याप्रकरणी आमदार शिंदे यांचा दबाव नाही. उलट त्यांनी बैठकीत याविषयी तातडीने कारवाई करण्यासाठी सूचना केल्या आहेत.’’ दिलीप माने, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक