आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकळी पुलाच्या अस्तराचा अस्त; भविष्यात समस्या उद्भवण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन मोठे पूल आहेत. एक वडगबाळ येथे सीना नदीवर, दुसरा टाकळी येथे भीमा नदीवर बांधण्यात आला आहे. वडगबाळ येथील पुलाची स्थिती चांगली आहे. टाकळी येथील पुलावरील अस्तर निघाले आहे. टाकळीचा पूल सर्वात जुना आहे. 1957 मध्ये त्यावेळच्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचा भार लक्षात घेऊन बांधकाम करण्यात आले होते.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली आणि वाहतुकीचा भार वाढतच गेला. हा पूल दोन राज्यांना जोडणारा असल्यामुळे कर्नाटकमधून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या पुलाचे अस्तर निघाले आहे. लोखंडी बार वर आले आहेत. या बारचा दुचाकी वाहनांना खूप त्रास होत आहे. एका वर्षापासून ही स्थिती कायम आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने या पुलाची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान पुलाचे अस्तर निघत असल्याचे दिसून आले. यामुळे नव्याने अस्तरीकरण करण्याचे ठरले. मात्र, अद्यापही त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याने पुलाच्या अस्तराची अवस्था दयनीय झाली आहे. सध्या सोलापुरातील सर्वात जुन्या पुलाकडे असे दुर्लक्ष केले जात आहे. वेळीच डागडुजी केली नाही तर भविष्यात समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
भीमानगर येथे अस्तरीकरण - भीमानगर येथील पुलांवरील अस्तर निघत होते. याची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने 1998 मध्ये या पुलाचे अस्तरीकरण केले होते. त्यावेळी गंभीर दखल घेतली जाते तर आता टाकळी येथील पुलाबाबत गांभीर्य का दाखवले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लहान पुलांची स्थिती उत्तम - दोड्डी नाला, हरणा नाला, शेळगी नाला, बोरामणी नाला, मुळेगाव नाला, हत्तूर नाला, वडगबाळ नाला, उळे नाला आदी आठ नाल्यांवर पूल बांधण्यात आले आहेत. या पुलांच्या बांधकामाला साधारण 25 ते 30 वर्षे झाली असून, पुलांची स्थिती उत्तम आहे. येत्या काही महिन्यात मोठय़ा पुलांसह या लहान पुलांचेही हस्तांतरण करण्यात येणार आहे.
पुलांचे हस्तांतरण - शहरातील 2 मोठे आणि 8 लहान पुलांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. यातील पुणे महामार्गावरील मोठय़ा पुलांचे ऑगस्ट 2010 मध्ये भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत टाकळी पुलाचेही हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. हे हस्तांतरण करताना शहरापासून 13.500 किलोमीटर नंतरचा भाग हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर हैदराबाद महामार्गावरील 8 किलोमीटर अंतर सोडून उर्वरित 21 किलोमीटर रस्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. यानंतर शहरातील 8 लहान पुलांचेही हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शासकीय ‘चाल’ढकल महागात पडेल.. - टाकळीचा पूल हा कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात मैत्रीचा संदेश देणारा आहे. पुलाची सध्याची परिस्थिती पाहता याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. हा रस्ता सततच्या रहदारीचा असल्याने योग्य वेळी उपाययोजना झाली नाही तर भविष्यात काहीही घडू शकते. नेहमीची शासकीय ‘चाल’ढकल ही मोठय़ा संकटाला निमंत्रण देणारी ठरू शकते. यासाठी प्रशासन तसेच शासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.’’- दामोदर वैद्य, निवृत्त नगर अभियंता, महापालिका
अधिकारी नॉट रिचेबल - टाकळी येथील जुन्या पुलाबाबत माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संतोष शेलार व अशोक भोसले यांच्याशी 12 जुलै रोजी दिवसभर त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. भोसले यांनी कॉल कट केला, शेलार यांनी फोन उचललाच नाही.
राष्ट्रीय महामार्ग विभागाची हद्द
तुळजापूर महामार्ग - शहरापासून 16.400 किलोमीटरपर्यंत
पुणे महामार्ग - शहरापासून हिंगणगावपर्यंत
विजापूर महामार्ग - शहरापासून 30.300 किलोमीटरपर्यंत
हैदराबाद महामार्ग - शहरापासून 29 किलोमीटरपर्यंत