आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी घेऊन काढा लग्नाची वरात, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील मुख्य रस्त्यावरून लग्नाची वरात काढताय? सावधान. आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलिसांची परवानगी घेऊनच वरात काढा अन् तिही अंतर्गत रस्त्यांवरून. मुख्य रस्त्यावर वरात काढण्यासाठी परवानगी मिळणारच नाही. अन्यथा वाहतूक नियमास अडथळा आणला, ध्वनिप्रदूषण केले म्हणून कारवाई होऊ शकते.
लग्नाची वरात म्हणजे मोठ्या आवाजात बँजो, संगीत आॅर्केस्ट्रा, डॉल्बी, रस्त्यावर संगीतावर नृत्य करणे असा पायंडा सोलापुरात आहे. आपल्यामुळे नागरिकांना, वाहनधारकांना मनस्ताप होतो, वाहतूक कोंडी होते याचे भान नसते. अशी अनेक प्रकरणे ताजी आहेत. नागरिकांच्या हितासाठी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लग्नाची वरात काढताना पोलिसांची परवानगी घेणे सक्तीचे केले आहे. या निर्णयाचे नागरिकांतून स्वागत होत आहे.
परवाना कसा काढाल
आपला विवाह ज्या भागात आहे त्या भागाच्या पोलिस ठाण्यात अर्ज द्यावा. वरात अंतर्गत रस्त्यांवरून जाणार, वाहतूक अडथळा होणार नाही, अशी हमी द्यावी लागेल. वाद्य असल्यास कोणती वाद्ये आहेत, त्याची वेगळी परवानगी घ्यावी लागते. पोलिसांचा वाद्य परवाना मिळाल्यानंतर बँडपथक येऊ शकतात. थोडक्यात वाहतूक अडथळा होऊ नये, ध्वनिप्रदूषण होऊ नये. हा उद्देश आहे.
- वरातीला सूटसुटीतपणे परवाने मिळण्यासाठी आणखी नवीन काही करता येईल का, याचा आढावा घेतो. लोकांची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे.
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त
- वरात काढता येते. पण, वाहतुकीला अडथळा होऊ नये. मुख्य रस्त्यावर वरात काढताना काळजी घ्यावी लागेल. संस्कृती जपा अन् कायदाही पाळला पाहिजे.
अ‍ॅड. लक्ष्मण मारडकर
- हत्तीसाठी वनविभागाची परवानगी लागते. आम्ही परवाना दिला नाही. शहरात हत्ती फिरला असल्यास वन नियमाप्रमाणे पुढील निर्णय होईल.
सुभाष बडवे, उप वनसंरक्षक, सोलापूर