आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाच घेताना तलाठ्यास पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला / अकलूज- जिल्ह्यात मंगळवारी (दि. २६) लाच घेणाऱ्या तलाठी आणि सेतू कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले. कटफळचे तलाठी औदुंबर तुकाराम लिगाडे (वय ३८, रा. कडलास, ता. सांगोला) माळशिरस तहसीलच्या सेतू कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर वर्षा कांबळे (रा. विद्यानगर, माळशिरस) अशी दोघांची नावे आहेत. तलाठी लिगाडे यांनी अन्नसुरक्षा योजनेत समावेशासाठी एक हजाराची तर कॉम्प्युटर ऑपरेटर कांबळे यांनी तत्काळ उत्पन्न दाखला देण्यासाठी २०० रुपयांची लाच घेतली.
कटफळ प्रकरणातील तक्रारदारांनी अन्नसुरक्षा योजनेत त्यांचे आणि वडिलांचे नाव समावेशासाठी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी तलाठी लिगाडे यांच्याकडे आला होता. त्यांनी चौकशी करून अर्जदार त्यास पात्र असल्या-नसल्याचा अहवाल द्यावयाचा होता. त्यात समावेश करण्यासाठी तलाठी लिगाडे यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे अर्जदाराने सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संबंधित तलाठ्याच्या विरोधात तक्रार केली होती.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कडलास नाक्यावरील एका हॉटेलमध्ये सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने तलाठी लिगाडे यांना पैसे घेताना पकडले. याप्रकरणी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

एकशिव (ता. माळशिरस) येथील तक्रारदार अक्षय लक्ष्मण ढेकळे (वय २२) यांच्या वडिलांच्या नावे तीन वर्षांच्या उत्पन्नाचा दाखला स्वत:च्या जबाबदारीवर तत्काळ दाखला काढून देण्यासाठी सेतूमधील कॉम्प्युटर ऑपरेटर कांबळे यांनी त्यांच्याकडे २०० रुपयांची मागणी केली. त्यामुळे अक्षय ढेकळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी दुपारी दोनशे रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्यांना पकडले.
बातम्या आणखी आहेत...