आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्या विंचू आज पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - (स्व.) लक्ष्मीकांत बेर्डे आणि तात्या विंचूने मराठी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला होता. दोन दशकानंतर तात्या विंचू पुन्हा शुक्रवारी प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. यावेळी तात्या विंचूच्या करामती थ्री-डीतून पाहता येतील. अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्रथमच मराठीत वापरले जात आहे. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा झपाटलेला-2 चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकातही उत्सुकता आहे.


माहेरची साडीसारख्या चित्रपटाची लाट असलेल्या काळात महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटात वेगळ्या पद्धतीचे कथानक आणले. झपाटलेला या चित्रपटाला दोन दशकापूर्वी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ब-याच काळाचा गॅप घेऊन दिग्दर्शक महेश कोठारे यांनी झपाटलेलाचा सिक्वल असलेल्या झपाटलेला-2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


महेश कोठारेंचे वेगळेपण : अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळेपण जपले आहे. सिनेमास्कोप, इस्टमन कलर असे आधुनिक प्रयोग मराठीत प्रथमच करणारे कोठारे झपाटलेला-2 च्या माध्यमातून मराठीतील पहिला थ्रीडी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 36 दिवसांत झाले असून तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट सरस झाला आहे. युरोप व स्पेनच्या तंंत्रज्ञाच्या साहाय्याने तयार केलेल्या या चित्रपटात स्पिट बिम या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, पटकथा महेश कोठारे व अशोक पाटोळे यांचे असून निर्माते आदिनाथ कोठारे आहेत. गीतकार गुरू ठाकूर असून संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे.


साडेपाच कोटींचे बजेट
शासनाच्या अनुदानावरच बहुतेक मराठी चित्रपटांची निर्मिती होते. मोजकेच चित्रपट बिग बजेट असतात. झपाटलेला-2 हा साडेपाच कोटीत तयार झालेला चित्रपट आहे. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून थ्रीडी इफेक्ट प्रथमच मराठी प्रेक्षकाला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्‍ट्रासह भारताच्या बाहेर लंडन, दुबई, आबुदाबी या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


प्रमुख कलावंत
चित्रपटात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, मधु कांबीकर, सई ताम्हणकर, विजय चव्हाण, मकरंद अनासपुरे, राघवेंद्र कडकोळ यांच्यासह महेश कोठारे यांचीही भूमिका आहे.