आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांचे मोबाइल ‘आॅन’; कारवाईचा निर्णय झाला ‘आॅफ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शाळेच्या वेळेत मोबाइलवर बोलणार्‍या गुरुजी अन् बार्इंवर थेट कारवाई करण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पण, अद्याप एकाही शाळेची तपासणी करण्याचे धाडस शिक्षण विभागाने दाखविले नाही. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी बैठकीत घेतलेला निर्णय अन् त्याची केलेली घोषणा केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट झाले. वर्गामध्ये शिक्षकांचे मोबाइल खणखणतात. प्रशासनाने केवळ घोषणा करून कारवाईच ‘आॅफ’ केल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारने शिक्षकांना शाळेत मोबाइल वापरास बंदी घातली आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शिक्षक सर्रास मोबाइल वापरतात. त्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडत असल्यामुळे शाळेत मोबाइल वापरणार्‍या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय झेडपीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
शाळांची ढासळती गुणवत्ता सुधारण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. अनेक शिक्षक शिकवण्यापेक्षा मोबाइलवर बोलण्यात मग्न असतात. मोबाइलच्या रिंगटोनचा अचानक होणारा आवाज अन् वर्गामध्ये मोबाइलवर मोठ्या आवाजात बोलणार्‍या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होतात, असे मानसशास्त्रीय अभ्यासात निष्पन्न झाले आहे.

राज्य शासनाने शाळेत मोबाइल वापरताना आढळणार्‍या शिक्षकांवर पहिल्यांदा 100 रुपये दंडाची कारवाई सुचवली आहे. तर, तीच चूक पुन्हा घडल्यास प्रशासकीय कारवाईचा आदेश आहे. त्याच निर्णयानुसार झेडपीच्या शाळांमध्ये शिक्षकांना कायमस्वरूपी मोबाइलबंदी करण्यासाठी मोबाइल जप्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही पुन्हा मोबाइल वापरताना आढळणार्‍या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पदाधिकार्‍यांनी केली होती. पण, त्याची अंमलबजावणी करण्याचे भान अधिकार्‍यांना नाही. त्यामुळे पदाधिकारी केवळ कामाचा दिखावा अन् प्रसिद्धीसाठी घोषणा करीत असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांत जागृती करू
शाळेत मोबाइल वापरास बंदीच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. पण, प्रशासनातर्फे बैठकांच्या सूचना मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात येतात. त्याबाबतही विचार व्हावा. मोबाइलमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतात, याचे भान राखण्याची गरज आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्याबाबत जागृती करू.’’
शिवानंद भरले, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

सूचना दिल्या, कारवाई करू
शाळेच्या वेळेत मोबाइल वापरू नका, याबाबतचा आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना कळविला आहे. गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकार्‍यांना तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकीतील निर्णयानंतर तपासणी झाली नाही. पण, यापुढे आम्ही मोबाइल वापरणार्‍या शिक्षकांबाबत कठोर निर्णय घेणार आहे.’’
मदारगनी मुजावर, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग