आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाची अस्थायी अभ्यासमंडळे बरखास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठातील तब्बल 33 अस्थायी अभ्यासमंडळे कुलपती कार्यालयाच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली.या अस्थायी अभ्यासमंडळाची कारकीर्द ही दोन वर्षांपेक्षा जास्त असू नये, असा संकेत आहे. मात्र, सोलापूर विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी अस्थायी अभ्यासमंडळांना पाच वष्रे काम करण्याची संधी मेहरबान केली होती. त्यामुळे पीएच.डी. नसलेले अध्यक्ष झाले, तेच प्रश्‍नप्रत्रिका काढू लागले आणि परीक्षक म्हणूनही कार्य करू लागले. हा प्रकार नियमांना डावलून होता. सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे प्रा. सतीश राजमाने यांनी याबाबत विद्यापीठासह राज्यपालांकडेही तक्रार दाखल केली होती. अस्थायी अध्यक्षांना विद्या परिषदेच्या बैठकींना न बोलाविण्याचे धोरण विद्यापीठाने घेतले होते. त्यावर सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा) नाराज झाली होती. त्यांनी थेट पदवीदान समारंभावरच बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. त्या पार्श्वभूमीवर या कारवाईला महत्त्व आहे.


कुलपती कार्यालयाकडून आदेश
कुलपती कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठातील कार्यकाल संपुष्टात आलेली 33 अस्थायी अभ्यासमंडळे बरखास्त करण्यात आली आहेत. एप्रिलमध्ये होणार्‍या विद्या परिषदेत या विषयावर चर्चा होणार आहे.’’ शिवशरण माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ


पुढे काय ?
अभ्यासमंडळ बरखास्त केल्याने विद्यार्थ्यांवर थेट परिणाम नाही. मात्र, पेपर सेटिंग, परीक्षकांची यादी, अभ्यासक्रमात बदल, नवे अभ्यासक्रम, प्रश्‍नपत्रिकेतील चुका व आक्षेपासंदर्भात निराकरण करणे आदी विविध कार्ये ही अभ्यासमंडळे करत असतात. त्यामुळे अस्थायी अभ्यासमंडळे बरखास्त झाली असली तरी त्याजागी नवनियुक्ती करणे ही बाब आता अग्रक्रमाने करावे लागेल. येत्या एप्रिल महिन्यात आयोजित विद्या परिषदेच्या बैठकीत या अभ्यासमंडळांची पुनर्रचना होण्याची अपेक्षा आहे.


निर्णयाचे स्वागत
विविध नियमबाह्य कामे करत असल्याने कुलपती कार्यालयाकडे निवेदन पाठवून ही अभ्यासमंडळे रद्द करण्याची मागणी केली होती. उचित कारवाईचे स्वागत आहे.’’ प्रा. सतीश राजमाने, संस्थापक, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघटना


निवेदन पाठवले
अस्थायी अभ्यासमंडळांचा कालावधी संपल्यामुळे हा निर्णय झाला. संघटनेतर्फे कुलपती कार्यालयाकडेही याबाबतचे संदर्भ व तपशीलवार माहिती देण्यात आली होती.’’ प्रा. देविदास कसबे, अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)