आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत विठ्ठल परिवारातील २८ मंदिरांचा ताबा घेण्यास सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शहरातील विविध अठ्ठावीस परिवार देवतांची मंदिरे ताब्यात घेण्याची प्रक्रिया शनिवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक विलास महाजन मंदिरातील इतर कर्मचाऱ्यांनी परिवार देवतांची मंदिरे ताब्यात घेतली.

या वेळी परिवार देवतांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या बडवे मंडळींनी सहकार्याची भावना दाखवत ताब्यातील मंदिरे समितीच्या ताब्यात देऊ केली, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.

श्री. कादबाने म्हणाले, गेल्या वर्षी १५ जानेवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बडवे, उत्पात तसेच सेवाधारी यांची मंदिरातील हक्क अधिकार या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे अधिनियमन १९७३ या कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळली. त्यामुळे मंदिरातील बडवे, उत्पात आणि सेवाधाऱ्यांचे सर्व हक्क आणि अधिकार संपुष्टात आले. त्या नंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे पूर्णपणे शासनाच्या ताब्यात आले. या मंदिराचे कामकाज सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पाहात आहे.
शहराच्या विविध भागातही जी विविध देवतांची लहान मोठी मंदिरे आहेत तीदेखील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिवार देवता म्हणून ओळखल्या जातात. तीदेखील बडवे मंडळींच्याच ताब्यात होती. त्यामुळे शहरातील या विविध परिवार देवताही ताब्यात घेण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून मंदिर समितीने सुरू केलेली होती. परिवार देवतांच्या पूजाविधींसाठी खास पुजारी आणि सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील दिवाणी न्यायालयाने बडवे मंडळींच्या वतीने परिवार देवतांच्या पुजारी भरती प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज फेटाळला होता.

ही मंदिरे घेण्यात आली ताब्यात
शनिवारी दिवसभर महाद्वारामधील खंडोबा मंदिर, शाकंभरी देवीचे मंदिर ताब्यात घेतले. विठ्ठल मंदिराजवळचे एकवीरा देवी मंदिर, जुन्या पुलाजवळील अंबाबाई मंदिर, उपजिल्हा रुग्णालयाजवळील व्यासनारायण मंदिर, गोपाळपूर रस्त्यावरील प्राचीन विष्णूपद मंदिर, रिद्धीसिद्धी गणेश मंदिर, प्रदक्षिणा रस्त्यावरील काळा मारुती मंदिर अशी पंढरपूर शहरातील एकूण २८ परिवार देवतांची मंदिरे ताब्यात घेण्यात आली. या सर्व मंदिरात पुजारी सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.