आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Term Given To The Commissioner Alternate Days Water

दिवसाआड पाण्यासाठी आयुक्तांनी दिली मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सुरळीत पाणीपुरवठा करण्यात काय अडचण आहे? किती दिवसांत दिवसाआड पाणी मिळेल, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे सदस्य जगदीश पाटील यांनी विचारला. त्यावर उपअभियंता विजय राठोड यांनी आठ दिवसांत होईल, असे उत्तर दिले. मात्र, आयुक्त चंद्रकांत गुडेवार भडकले आणि राठोड तुमचे खूप झाले. आठ दिवसात एक दिवसाआड पाणी मिळाले नाही, तर निलंबितच करणार, अशी तंबी दिली. यावर सभागृहातील सदस्यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले.

नगरसेवकांनी सूचवलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना महापालिकेच्या सभेत गुरुवारी मंजुरी मिळाली. तब्बल 28 कोटी रुपयांची ही कामे भांडवली निधीतून होणार आहेत. सत्ताधारी व विरोधकांच्या निधी वाटपावरील संघर्षावर आयुक्त गुडेवार यांनी काढलेल्या तोडग्याप्रमाणे कामे सादर करण्यात आली. यात सत्ताधारी सदस्यांना 30 लाखांपर्यंत तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना 20 लाखांपर्यंतची कामे सूचवण्यास सांगितले आहे.
महापौर अलका राठोड अध्यक्षस्थानी होत्या. कामांची यादी संध्याकाळीच प्रत्येक विभागीय कार्यालयास पाठवण्यात आली. विभागीय कार्यालयानुसार तीन दिवसांत निविदा निघतील. निवडणुकीच्या आचारसंहितेची काहीही अडचण येणार नाही, अशी हमी गुडेवार यांनी दिली.

दिवसाआड पाण्यावरून लक्षवेधी
उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई होती. त्यावेळी शहरवासीयांना दोन दिवसांआड, नंतर तीन दिवसांआड पाणी देण्यात आले. तीनशे दिवसांपैकी शंभर दिवस पाणी देऊन तीनशे दिवसांची पाणीपट्टी आकारत आहे. आता पाणी मुबलक आहे. त्यामुळे पाणी मुबलक द्या, अन्यथा पाणीपट्टी कमी करा, अशी लक्षवेधी काँग्रेसचे अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी मांडली. विरोधी सदस्यांनी आपापल्या प्रभागामध्ये पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचा मुद्दा मांडला. भारतीय जनता पक्षाच्या सुरेश पाटील यांनी तांत्रिक मुद्दा उचलून सार्वजनिक आरोग्य अभियंता अहिरे यांना धारेवर धरले. एक व्हॉल्व्ह पंधरा दिवसांपूर्वी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये कसा बिघाड येतो? याचाच अर्थ काम निकृष्ट दर्जाचे आहे. यातून पैसे उकळण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला. अधिकारी मात्र, त्याचा खुलासा करू शकले नाही.