सोलापूर- नियतीने सामान्य आयुष्य नाकारलेल्या मात्र संर्घषाने जीवनाकडे वाटचाल करणार्या थॅलेसेमियाच्या चिमुकल्या रुग्णांना नियमितपणे रक्तपुरवठा करणे आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य पालकांना कठीण जाते. या समस्येची जाणीव ठेवून सोलापूरच्या गोपाबाई दमाणी रक्तपेढीने थॅलेसेमिया ट्रॉन्स्फ्यूजन सेंटर सुरू केले. याद्वारे दरमहा 200 मुलांना मोफत रक्त पुरवले जाते. रक्तपेढीच्या या ‘देण्याच्या सुखा’मुळे जगण्याची उमेद हरपलेल्या मुलांना नवजीवन देण्याचे अनमोल कार्य होत आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त त्यावर टाकलेला प्रकाश.
थॅलेसेमिया म्हणजे काय?
थॅलेसेमियाने पीडित मुलांमध्ये ऑक्सिजन पुरवणे व कार्बनडाय ऑक्साइड शरीराबाहेर काढण्याचे नियमित कार्य हिमोग्लोबीन करू शकत नाही. यात लाल पेशी कमी असल्याने त्यांना रक्त भरून घ्यावे लागते. सोलापुरात या रुग्णांना रक्त मिळणे सहजशक्य होत नाही. सध्या सप्ताहात चार दिवस रुग्ण रक्त घेण्यास येतात. 1987 पासून सुरू असलेल्या या सेंटरमधून आतापर्यंत लाखो थॅलेसेमिया रुग्णांना रक्त देण्यात आले आहे. हे रक्त धुऊन रुग्णांना दिले जाते.
मुंबईनंतर फक्त सोलापुरात सोय
मुंबई सोडल्यास थॅलेसेमियाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे रक्त पुरवठय़ाची सुविधा केवळ गोपाबाई दमाणी ब्लड बँकेतच आहे. केवळ पैसा हा उद्देश डोळ्यांसमोर न ठेवता या रक्तपेढीने समाजातील गरजूंना मदत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
रक्त देणे हा सर्वर्शेष्ठ सुखाचा भाग आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णांना अत्यवस्थ स्थितीत नेणारी अवस्था वाईट असते. रक्त देणार्या व रक्त घेणार्या व्यक्तींना ते रक्त कोणाचे याची माहिती नसते. त्यामुळे अज्ञानाचेही सुख मिळते. अशोक नावरे, प्रशासकीय अधिकारी, गोपाबाई दमाणी ब्लड बँक