आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thane Road Jail Premises To The Slaughter Plant Was

जेलरोड ठाणे आवारात झाली झाडांची कत्तल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-वृक्ष संरक्षण कायद्यानुसार वृक्षतोड किंवा तोडलेल्या झाडांची वाहतूक नियमानुसार करावी लागते. परंतु नियम धाब्यावर बसवून जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाडांची कत्तल करण्यात आली. यामुळे वृक्ष संवर्धन कायद्याचा बोजवारा उडवला. ही घटना शनिवारी दुपारी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, परवानगीसाठी पत्र दिले असल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
जेलरोड पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या एका छोट्या बागेत (मोकळय़ा जागेत) सुबाभूळ, पिंपळ व इतर झाडे आहेत. या जागेतच हॉलीबॉल खेळण्यासाठी क्रीडांगण तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अडथळा होत असलेली झाडे तोडण्याचे फर्मान सोडले गेल्याचे सांगितले जाते. तेथे शेजबाभूळ जातीचे झाड पूर्णपणे तोडले, तर पिंपळ व इतर जातीच्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन इसम झाडे तोडत असल्याची खबर महापालिकेच्या वन विभागाला कळाली. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी स्वप्नील वारू यांनी सहकार्‍यांसह तेथे जाऊन पंचनामा केला. कारवाईबाबतची पुढील कार्यवाही शनिवार, रविवारी सुटी असल्याने सोमवारी केली जाणार आहे.
सुबाभूळ झाड तोडण्यासाठी वन खात्याची परवानगी लागत नाही. मात्र, तोडलेल्या झाडाची वाहतूक करायची असल्यास त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. पिंपळ व इतर झाडांसाठी मात्र परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी महापालिका वन विभागाकडून घ्यावी लागते.
महापालिकेची परवानगी घेतली नाही
जेलरोड पोलिस ठाणे परिसरातील शासकीय जागेतील वृक्षतोड चालू असल्याचे कळल्यानंतर आम्ही तेथे गेलो होतो. इस्माईल शेख (रा. कुंभारी) व रफीक शेख (रा. नई जिंदगी) हे वृक्ष तोडत असल्याचे दिसले. जागेचा पंचनामा केला. वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली जाईल व त्यानंतर पुढील कारवाई होईल. या वृक्षतोड किंवा वाहतूक परवानगी मागण्याबाबतचे पत्र माझ्यापर्यंत तरी आलेले नाही. पत्र आयुक्तांना किंवा कार्यालयात दिले असेल तर माहिती नाही. पण परवानगी दिलेली नाही. त्यामुळे वृक्ष संरक्षण कायदा 1975 नुसार कारवाई करावी लागेल. स्वप्नील तारू, अधिकारी, वन विभाग, मनपा
लेखी पत्र दिले आहे
पोलिस ठाण्याच्या आवारात सुबाभूळचे झाड वाढल्यामुळे ते काढले आहे. त्याला काही परवानगी लागत नाही. पण, तरीही महापालिकेला उद्यान विभाग अधीक्षकांना लेखी पत्र दिले आहे. महापालिकेचे कर्मचारी आले होते, त्यांनी माहिती घेतली. हे काम बेकायदेशीर कसे म्हणता येईल. अनिल दबडे, पोलिस निरीक्षक, जेल रोड