आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमगरवाडीचे कार्य देशाच्या पटलावर, प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने यमगरवाडी प्रकल्पाचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वडार,पारधी, कोलाटी, वंजारी आदी भटक्या विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यमगरवाडी प्रकल्पाचा जन्म झाला. अनेक सामाजिक संस्था, संघटनेच्या सहकार्यामुळे प्रकल्पाला प्रेरणा मिळाली. पुरस्काररूपी थाप मिळाली की भरभरून येते. आता खऱ्या अर्थाने यमगरवाडीचे कार्य देशाच्या पटलावर पोहोचले असल्याचे समाधान वाटते, अशी भावना भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ. सुवर्णा रावळ यांनी व्यक्त केली.
प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने प्रिसिजन गप्पा या तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात रविवारी प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या यमगरवाडी प्रकल्पास(जि. उस्मानाबाद) गौरविण्यात आले. यावेळी डॉ. रावळ बोलत होत्या. दोन लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच या वेळी परमेश्वर काळे यांना स्व. सुभाष शहा समाजसेवा पुरस्कार (स्वरूप : एक लाख रुपये) प्रदान करण्यात आला.

फॅन्ड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. व्यासपीठावर डॉ. प्रदीप आवटे, प्रिसिजनचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा,डॉ. सुहासिनी शहा, चंद्रकांत गडेकर, यमगरवाडी प्रकल्पाचे महादेव गायकवाड रवींद्र जोशी आदी उपस्थित होते. रावळ म्हणाल्या, यमगरवाडी प्रकल्पास सोलापूरच्या अनेक संस्था आणि स्वयंसेवकांचे सुरुवातीपासून सहकार्य राहिले आहे. प्रत्येकाच्या मदतीच्या हाताने यमगरवाडीचा मळा फुलला आहे. वंचित समाजघटकाला समाजात आणण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे. शिक्षण, सन्मान, सुरक्षा स्वावलंबन या चतु:सूत्रीवर संस्थेचे कार्य सुरू आहे. प्रास्ताविक डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. माधव देशपांडे सूत्रसंचालन यांनी केले.
गुरू-शिष्य आले एकाच व्यासपीठावर
प्रिसिजनच्या कार्यक्रमात अनेक योगायोग घडून आले. प्रिसिजनचा सामाजिक पुरस्कार यमगरवाडी प्रकल्पास मिळाला तर त्याच संस्थेत शिकलेल्या परमेश्वर काळे यांना स्व. सुभाष शहा समाजसेवा पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय परमेश्वर काळे यांच्या शाळेत शिकलेला कलावंत सूरज पवारने नागराज मंजुळे यांच्या पिस्तुल्या चित्रपटात काम केले आहे. पवार हा सेलिब्रेटी म्हणून कार्यक्रमास हजर होता. तसेच मुलाखत घेणारे डॉ. प्रदीप आवटेही उस्मानाबाद येथील असल्याने कार्यक्रमात रंगत आली.