आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The New Movement In Local Politics In Connection With Subhash Deshmukh And Mohite Patil

सुभाष देशमुख व मोहिते-पाटील यांच्यामुळे दोन्ही पक्षांत अस्वस्थता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादीमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्याला कारणेही तशीच घडू लागली आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे निवेदन दिले. प्रदेश भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सोलापुरात नुकत्याच झालेल्या बैठकीला दांडी मारणारे भाजप नेते, माजी खासदार सुभाष देशमुख हे केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून आले. या दोन्ही नेत्यांच्या कृतीमुळे दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

चालू आठवड्यातील या दोन्ही घटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपमध्येही अस्वस्थता पसरली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा अँड. शरद बनसोडे यांनी केल्याने उमेदवारांच्या शोधात असलेल्या भाजपला सुभाष देशमुख यांनी दुसरा झटका दिला आहे. प्रदेश भाजपची सोलापुरात बैठक झाली, त्याला त्यांनी दांडी मारली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा मेळावा होत असताना त्यांना पूर्ण बाजूला ठेवले गेले, केवळ शहर उत्तरचा मेळावा आहे, असे चित्र दाखवण्याचा प्रयत्न झाला, असे भाजपचे काही कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे देशमुख बैठकीपासून दूर राहिल्याची चर्चा सुरू असतानाच देशमुखांनी तीन दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची भेट घेतली होती. याची कार्यकर्त्यांत खुमासदार चर्चा सुरू आहे. या भेटीत राजकीय चर्चा कोणती झाली याचा तपशील उपलब्ध नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? असा पेच आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जाते. सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातूनही इच्छुक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

पुढील निर्णयाबद्दल उत्सुकता
दुसरीकडे कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा घेऊन राज्याचे लक्ष वेधून घेणार्‍या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापुरात शरद पवार यांच्या स्वागताला अनुपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बुधवारी भेट घेतली. पण तेथे जाताना त्यांनी काँग्रेसचे मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना सोबत नेले. त्यामुळे मोहिते-पाटील यांची भूमिका नेमकी काय? याची चर्चा रंगली आहे. ज्यांनी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविली ते सर्वजण त्यांच्या सोबत मुंबईत होते. गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते-पाटील यांना सत्तेच्या राजकारणापासून बाजूलाच ठेवले आहे, त्याचेच हे परिणाम असल्याचे उघड आहे. मोहिते-पाटील पुढे कोणता निर्णय घेतात, याचीच उत्सुकता आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...