आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Work Of The New Bund In Pandharpur For Devotees

आषाढीला विठ्ठलभक्तांच्या पवित्र स्नानाची मिटणार चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- चंद्रभागा नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी असावे याकरता येथील विष्णूपद मंदिराच्या पुढील बाजूस १०.९५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या नव्या बंधाऱ्याचे काम सुरू आहे. आषाढी यात्रेआधी काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या काळात विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या स्नानापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरता चार मोठ्या यात्रांसह रोज हजारो भाविकांची येथे मांदियाळी असते. त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. त्यातून शहरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. मात्र, चंद्रभागा नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी साठू शकत नाही. त्यामुळे भाविकांना नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात स्नान करावे लागते. अनेकदा पाण्याअभावी त्यांना स्नानही करता येत नाही अशा तक्रारी होत्या.
१८ महिन्यांचा कालावधी
हा बंधारा पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत म्हणजेच आषाढी यात्रेआधी काही दिवस हे काम पूर्ण करण्याचा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी िनर्धार व्यक्त केला आहे. त्यानुसार रात्रंदिवस काम सुरू आहे.
१०.९५ दलघफू पाणीसाठवण क्षमता
या बंधाऱ्याची उंची चंद्रभागा नदीच्या तळापासून दोन मीटर तर लांबी ३१५ मीटर आहे. त्याला ८१ दारे ठेवली आहेत. साठवण क्षमता १०.९५ दशलक्ष घनफूट आहे. जुन्या बंधाऱ्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर हा बंधारा आहे.
दर्जाबाबत तडजोड करणार नाही
- १५ जुलैपर्यंत बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार दिवसरात्र कामे केली जात आहेत. कामे वेगात सुरू असली तरी त्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
संजय तेली, प्रांताधिकारी, पंढरपूर विभाग