आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डफरीन चौकात दुपारी एक लाख पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंपावरील पंक्चर दुकानात दुचाकीला अडकवलेली एक लाख पाच हजार रुपयांची बॅग चोरांनी हातोहात पळवली. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमाराला घडली. गोपाळ दळवे (रा. केगाव, उत्तर सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते शेतकरी आहेत. डफरीन चौकातील एका बँकेतून त्यांनी पैसे काढून घेतले. बाहेर आल्यानंतर दुचाकी पंक्चर झाली होती. त्यासाठी पंपावर दुचाकी आणली. पैशाची बॅग दुचाकीलाच होती. चोराने त्यांची नजर चुकवून बॅग पळवली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला नाही. पंपावर सीसीटीव्ही आहे. पण, त्याची छबी स्पष्टपणे आली नसल्याचे सांगण्यात आले. संशयित चोरटा 30 ते 32 वर्षीय असून, त्याचे केस कुरळे व शरीर जाड असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुचाकीची चाके चोरीला
उत्तर सदर बझार येथील अभिजित निर्मल यांच्या दुचाकीची दोन्ही चाके चोरांनी पळवली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घरासमोर दुचाकी (एमएच 13 बीएम 6641) लावली होती. चाकांची किंमत सोळा हजार रुपये आहे. फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद नोंदली आहे.

मंगळसूत्र हिसकावले
मुरारजीपेठेतील शरदचंद्र पवार प्रशाला येथून पायी जाताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना शानिवारी रात्री नऊच्या सुमाराला घडली. सुमारे दोन ते तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, रात्री अकराच्या सुमाराला फौजदार चावडी पोलिसांत चौकशी केली असता अद्याप काहीच माहिती नाही, असे सांगण्यात आले.