आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thief Say , Owner Giving Money Thats Why Taking Two Wheeler

चोर म्हणतो, मालक पैसे देणार असल्यामुळे दुचाकी नेतोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मोदी रेल्वे पुलाजवळील गंगामाई हॉस्पिटलच्या आवारात लावलेली मोटारसायकल एक चोर प्लगसॉकेट तोडून पळवून नेत होता. सुरक्षा रक्षकाला संशय आल्यामुळे त्याने गाडी अडविली. विचारणा केल्यानंतर त्याला उत्तर देता येईना. गाडीचा मालक तीस हजार रुपये देणार आहे, असे म्हणत तो गाडी नेण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात गाडीचा मूळ मालक आला आणि चोराचे पितळ उघडे पडले. चोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार रविवारी घडला.
किरण जयकुमार सोनावणे (वय 26, रा. संजयनगर, रामवाडी) याला अटक झाली आहे. सोमण्णा कुंभार (रा. गौडगाव, अक्कलकोट) यांनी सदर बझार पोलिसात शनिवारी रात्री फिर्याद दिली आहे. कुंभार यांचे नातेवाइक आजारी असल्यामुळे गंगामाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी मोटारसायकल (एमएच 13 एएस 5634) पार्किंगमध्ये लावली होती. त्यावेळी किरणने मोटारसायकल नेताना सुरक्षा रक्षकाने अडवून चौकशी केली. थातूर-मातूर उत्तर दिल्यामुळे त्याला थांबविले. तेवढ्यात सोमण्णा बाहेर आले. ही गाडी माझी असल्याचे सांगितले. त्याला पकडून ठेवून पोलिसांना माहिती दिली. हवालदार बाबासाहेब बनसोडे यांनी त्याला अटक केली. संशयित हा अट्टल चोरटा असल्याची माहिती मिळाली.
एका युवकास अटक
मोदी पोलिस चौकीजवळ एसटीवर (एमएच 14 बीटी 2583) दगडफेक केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक झाली आहे. शांताराम नेल्सन इंडीगिरी (वय 26, रा. आरबी 2-172 मोदी कॉलनी) असे त्याचे नाव आहे. तानाजी शिंदे (बसचालक, नेमणूक सांगली डेपो) यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. ‘तुला नीट बस चालविता येत नाही’ असे म्हणत वीट फेकून काच फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला घडली होती.
इचलकरंजी-सोलापूर या मार्गावरील ती बस होती. हवालदार बाबासाहेब बनसोडे
तपास करीत आहे.
साखरपेठेत हाणामारी
घराच्या छतावरून खाली पाणी पडत असल्याचा जाब विचारल्यामुळे संदीप अन्ने (रा. साखरपेठ) यांच्यासह भाऊ, आई यांना मारहाण झाली. महमदसाब मौलाली हिरापुरे (साखरपेठ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संदीप यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. वैभव अन्ने व त्यांच्या आईला मारहाण झाली. हवालदार अनंत कवळस तपास करीत आहेत.
‘त्या’ पीडित मुलींवर उपचार सुरू
कुंभारीजवळील एका परिसरात राहणा-या पित्याने आपल्या तीन मुलींवर दुष्कर्म केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ‘त्या’ दोन पीडित मुलींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे तपास अधिकारी साहाय्यक निरीक्षक खोकले यांनी सांगितले.