आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसाचा गोळीबार, दरोडा हाणून पाडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे-सोलापूर पॅसेंजरवर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोफळज रेल्वे स्थानकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. सुमारे १० ते १२ दरोडेखोर डब्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. गाडीत सुरक्षेसाठी असलेल्या आरपीएफ जवानाने तत्परता दाखवत हवेत गोळीबार केला. त्यामुळे दरोडखोर पळून गेले आणि मोठा अनर्थ टळला. याबाबत कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे रेल्वे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे-सोलापूर पॅसेंजर पुण्याहून शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निघाली. शनिवारी पहाटे वाजण्याच्या सुमारास क्रॉसिंगसाठी पोफळज स्थानकावर गाडी थांबली होती. दरम्यान, गार्डच्या डब्यापासून तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वसाधारण डब्यात १० ते १२ दरोडेखोर घुसण्याच्या प्रयत्नात होते. गाडीत सुरक्षेसाठी असलेले आरपीएफ जवान चौगुले यांचे लक्ष गेले. त्यांनी आपल्याजवळीत बंदुकीतून तत्काळ हवेत एक राऊंड फायर केला. गोळीबारच्या आवाजाने दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. मात्र, जाताना गाडीवर दगडफेक केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. काहीही साहित्य चोरीला गेले नाही. पहाटे वाजून मिनिटांनी गाडी सोलापूरकडे मार्गस्थ झाली.
रेल्वे सुरक्षा वाऱ्यावर
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर रेल्वे स्थानकावरची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. स्थानकावर वाढलेले चाेऱ्यांचे प्रमाण असो की हाणामारीच्या घटना असो. सोलापूर स्थानकावर केवळ गंुडाराज चालल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे पाकिट मारणारे हात आता आमदार कन्येच्या मंगळसूत्रापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरूच आहे. रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे आता केवळ नावापुरतेच उरले आहे. या कॅमेऱ्यातून गुन्ह्याचा उलगडाच होत नाही. मागील आठवड्यात सोलापूर रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्याकडून गुलबर्ग्याच्या एका प्रवाशाचा खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस चौकीत घुसून विक्रेत्यांनी गोंधळ घातला. या आधीही असे प्रकार घडल्याने आरपीएफचीच सुरक्षा धोक्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांनी अशी घ्यावी काळजी
उन्हाळ्यातरात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवाशांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. उकडत असल्याने अनेक प्रवासी दरवाजे खिडक्या उघडे ठेवून झोपी जातात. त्याचाच फायदा दरोडेखोर घेतात आणि गाडीत प्रवेश करून दरोडा टाकतात. प्रवाशांनी दरवाजे अथवा खिडक्या बंद ठेवव्यात. तसेच एखाद्या स्थानकाजवळ गाडी क्रॉसिंगसाठी थांबली असताना काही प्रवासी दरवाज्यातून खाली उतरतात. असे प्रकार करू नयेत. यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.
आता दुहेरीकरणाला गती मिळण्याची गरज
दौंडते कुर्डुवाडी या सेक्शनमध्ये जिंती, पारेवाडी, पोफळज आदी स्थानक डेंजर झोन मानले जातात. मध्यंतरी रेल्वेने या भागात सुरक्षा वाढवली होती. आजच्या घटनेने येथील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्रॉसिंगच्या वेळीच दरोड्याचा प्रकार झाला आहे. या सेक्शनमधील दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण झाल्यास संवेदनशील स्थानकावर गाडी थांबणार नाही. आणि अशा घटनावर नियंत्रण येईल. त्यासाठी दुहेरीकरण कामाला गती मिळण्याची गरज आहे.
कोम्बिंग ऑपरेशन करणार
- दरोडेखोर डब्यात घुसण्याचा प्रयत्न आरपीएफ जवानामुळे अयशस्वी झाला. घटना गंभीर असल्याने आरपीएफ, लोहमार्ग पोलिस स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या शोधासाठी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेणार आहे.
डी. विकास, विभागीय आयुक्त आरपीएफ
बातम्या आणखी आहेत...