आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उजनीतून वाहून जाणार्‍या पाण्याचा विचार व्हावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उजनी धरण 100 टक्के भरत असतानाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार 16 ऑगस्ट रोजी धरणावर आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीत उजनीतील उपलब्ध पाण्याबरोबरच वाहून जाणार्‍या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. गेल्या 25 वर्षांत उजनीतून 2500 टीएमसीहून अधिक पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. हे पाणी अडवण्यासाठी भीमा आणि सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

उजनी धरणाची क्षमता 117 टीएमसी आहे. 1981 ते 2012 या कालावधीत पावसाळ्यात उजनी धरणात 25 वेळा 100 टक्क्यांहून अधिक साठा राहिला तर 7 वेळा 20 ते 50 टक्के साठा राहिला. लाभक्षेत्र प्राधिकरणकडील उपलब्ध आकडेवारीनूसार 25 वर्षे उजनीतून 2500 हून अधिक टीएमसी पाणी भीमा आणि सीना नदीतून कर्नाटकात वाहून गेले आहे. या दोन्ही नद्यांवर पाणी साठवण्याचे सर्मथ पर्याय नाहीत. उन्हाळ्यात या दोन्ही नद्यांचे पात्र कोरडे पडल्याचे पाहायला मिळते. उजनीचा लाभ खर्‍या अर्थाने माढा, माळशिरस, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यांना होतो. उर्वरित मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट हे तालुके उजनीच्या पाण्यापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर आता भीमा आणि सीना नदीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी जोर धरत आहे. नुकतेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे संघटक विलास लोकरे यांनीही याबाबत निवेदन दिले आहे.


बॅरेजेस का ?
मंगळवेढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी वडापूर येथे धरण बांधण्याचा विचार काही दिवसांपूर्वी पूढे आला होता. धरणासाठी मोठय़ा प्रमाणावर भू-संपादन करावे लागते. त्यामुळे मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी त्याला विरोध केला होता. एका बॅरेजेसमध्ये 2 ते 3 टीएमसी पाणीसाठा करणे शक्य आहे. दोन्ही नद्यांवर 10 बॅरेजेस बांधल्यास किमान 30 टीएमसी पाणीसाठा होईल. त्यातून पाणीपुरवठा योजनांबरोबरच शेतीलाही मोठा लाभ होईल.


पवारांना निवेदन देणार
कर्नाटकात वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी भीमा आणि सीना नदीवर 11 बंधारे बांधण्याची मागणीचे पत्र आम्ही नुकतेच लाभक्षेत्र प्राधिकरणला दिले आहे. शुक्रवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार आहोत. यासाठी आता उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापुरात लोकचळवळ उभी राहाण्याची गरज आहे.’’ विलास लोकरे, संघटक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस


बॅरेजेस गरजेचे
उजनीच्या पाणी नियोजनात भीमा, माण आणि सीना नदीत पाणी सोडण्याची तरतूद नाही, मात्र पिण्यासाठी अचल साठय़ातून पाणी सोडावे लागते. बॅरेजेस बांधल्यानंतर नदीत पाणी साठवता येईल. त्यासाठी उजनीतील अचल साठय़ाचा वापर करावा लागणार नाही. ’’ अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, कडा,