आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - तिसरे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन लंडन येथे 20 एप्रिल 2013 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी भारतातून 200 सावरकरप्रेमी सहभागी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली. गेल्या दोन वर्षात पहिले संमेलन मॉरिशस व दुसरे दुबई येथे आयोजित करण्यात आले होते. सावरकरांनी लंडन येथे शिक्षण घेता घेता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली आणि अद्भुत असा लढा उभारला.
1906 ते 1910 या काळात सावरकरांचे लंडन येथे वास्तव्य होते. सावरकरांच्या स्मृती जोडले गेलेल्या लंडन येथे स्वा. सावरकर सेवा संस्था ठाणे आणि औरंगाबाद येथील सावरकरप्रेमी मित्र मंडळातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून लंडन येथील महाराष्ट्र मंडळाचाही यात सहभाग असणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून संमेलनाची पूर्वतयारी सुरू आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आदी राज्यांतूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दळवी यांनी सांगितले.
कोणत्याही अनुदानाशिवाय संमेलनाचे आयोजन: कोणत्याही सरकारी किंवा खासगी अनुदानाशिवाय होत असलेले हे संमेलन लंडनमधील हीथ्रो विमानतळाजवळील हॉटेल शेरेटॉनच्या भव्य सभागृहात भरणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालणार्या या संमेलनात लंडनमधील 250 सावरकरप्रेमी सहभागी होतील. संमेलनाच्या दुसर्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मदनलाल धिंग्रा आदी देशभक्तांच्या स्मृतिस्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9820440821
संमेलनातील मार्गदर्शक वक्ते: साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे, अभिनेते शरद पोंक्षे, मधुसूदन ताम्हणे हे भारतातून तर अमेरिकेतील श्रीधर दामले, लंडन येथील डॉ. वासुदेव गोडबोले या वक्त्यांसह अनेक कवी, गायक, साहित्यिक, पत्रकार या संमेलनात सहभागी होणार आहेत.
लंडनच्या संमेलनात ‘सावरकर : ज्ञात आणि अज्ञात’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मी आणि दुर्गेश परुळकर यांनी संयुक्तरीत्या हे पुस्तक लिहिले आहे. सावरकरांच्या सहकार्यांविषयी आणि अभिनव भारत, लंडनमधील कार्य आदी विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे, संमेलनातील प्रमुख वक्ते
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.