आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएसआरडीसी रस्त्यांवर हजारांहून अधिक खड्डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात चांगले रस्ते करू, ते रस्ते किमान 15 वर्षे तरी खोदले जाणार नाही. तसे नियोजन करण्याचे आश्वासन देऊन सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक हा मॉडेल रस्ता तयार केला गेला. त्यानंतर हॉटेल त्रिपूरसुंदरीत नगरसेवकांना स्वप्न दाखवण्यात आले. आज मॉडेल रस्ता वगळता बाकीच्या सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी शिवाजी चौक, सम्राट चौक, दयानंद कॉलेज, अशोक चौक, गुरुनानक चौक, पत्रकार भवन, मोदी पोलिस चौकी या रिंगरूट रस्त्यावरील खड्डे मोजले असता ती संख्या 1145 इतकी भरली. चार इंचाहून अधिक खोलीच्या खड्डय़ांची ही संख्या आहे. तरीही या रस्त्यापायी नागरिकांकडून टोलची आकारणी करून पैसे काढले जात आहेत.

महापालिकेने शहरातील विविध भागात पाइपलाइनसाठी खड्डे खोदून ठेवले. रिलायन्स कंपनीस खड्डे खोदण्यास परवानगी देण्यात आली. आजही ते खड्डे बुजवले गेले नाहीत. खड्डय़ांच्या रस्त्यांवरून जाण्यासाठी नागरिकांनी टोल भरायचा का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. टोल घेता तर रस्ते का देत नाही? असा जाब वाहनधारक टोल नाक्यांवर विचारण्यात येत असल्याचे टोल वसुली कंपनीचे म्हणणे आहे.

या ठिकाणी खोदले खड्डे
सम्राट चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वर्धमान नगर, मंत्री-चंडक नगर, रूपाभवानी चौक, दत्त चौक, शाहीरवस्ती, दयानंद महाविद्यालय चौक, मार्केट यार्ड चौक, चिराग अली मैदान समोर, कवितानगर पोलिस वसाहत समोर, कुचन प्रशालेचा मुख्य प्रवेशद्वार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अशोक चौक, संत तुकाराम चौक, शास्त्रीनगर बस स्थानक, गुरुनानक चौक, महावीर चौक, सात रस्ता, शासकीय विर्शामगृह समोर, गांधीनगर ते सात रस्ता, मोदी पोलिस चौकी, जगजीवनराम झोपडपट्टी, मसिहा चौक आदी ठिकाणे.

सर्वपक्षीय आंदोलनाचा प्रयत्न
टोलमुक्तीसाठी सर्वच पक्षांनी पुढे येण्याची गरज आहे. टोलमुक्तीसाठी बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे हे शुक्रवार आणि शनिवारी लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता आमदार विजयकुमार देशमुख, दुपारी 12 वाजता आमदार दिलीप माने, सायंकाळी चार वाजता महापौर अलका राठोड, पाच वाजता आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना तर शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार दीपक साळुंखे, सायंकाळी चार वाजता आमदार प्रणिती शिंदे, सहा वाजता पालकमंत्री दिलीप सोपल यांना भेटणार आहेत.