आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगठी शोधताना आईच्या डोळ्यादेखत विहिरीत बुडाली तीन चिमुकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ - विहिरीच्या कडेला आई सासर्‍यांची हरवलेली सोन्याची अंगठी शोधत होती. जवळच तीन मुले बसली होती. शेजारी पाण्याने काठोकाठ विहीर भरलेली. गवतावरून पाय घसरून एक मुलगी पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी आईने उडी घेतली.

आईने विहिरीत मारलेली उडी पाहून काठावर बसलेल्या दोन्ही मुलांनी पाण्यात उडी मारली. एकाच वेळी तिघांना वाचवण्याचा आईचा प्रयत्न तोकडा पडला. अन् डोळ्यासमोरच तीन सख्या चिमुकल्या भावंडांचा जीव गेला. ही घटना सारोळे (ता. मोहोळ) येथे बुधवारी दुपारी 3.15 च्या सुमाराला घडली.

दुर्दैवी बालकांची नावे
सिद्धी सचिन शेळके (वय 8), तृप्ती सचिन शेळके (वय 6), पवनराजे सचिन शेळके (वय 1) अशी मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

मातेचा आक्रोश
मुले बुडालेली पाहून आई आक्रोश करीत होती. त्यादरम्यान शेळके कुटुंबातील सदस्य सागर शेळके हे विहिरीवर मोटर सुरू करण्यासाठी आले होते. मंगल यांचा आक्रोश त्यांच्या कानावर गेला. धावत-धावत ते विहिरीजवळ आले. हृदय पिळवटून टाकणार्‍या या प्रकाराची त्यांनी फोनवरून नातेवाइकांना माहिती दिली. सिद्धी, तृप्ती व पवनराजे यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. गावकर्‍यांच्या मदतीने ते पाण्याबाहेर काढले. याबाबत सागर शेळके यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

शेळके कुटुंबीय पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त. त्यांनी आपल्या सिध्दीच्या गळ्यात तुळशीची माळ घातली होती. मोहोळ येथील कन्या प्रशालेत ती दुसरीत शिकत होती. एकादशीच्या दिवशी शेळके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

लग्नाची तयारी
तीनही चिमुकल्यांचे काका सुशील शेळके यांचा 4 डिसेंबर रोजी विवाह होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती.