आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण देत हृदय करा सक्षम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर ते नवजात शिशूसारखे असते. त्याला प्रशिक्षण देऊन काही सवयी लावायच्या असतात. नित्य व्यायाम, योग, चालण्या, फिरण्याने हे काम शक्य आहे. त्यानंतरच हृदय सक्षम होते, अशी माहिती येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी रविवारी रुग्णांना दिली.

‘आयुष्य हृदयशस्त्रक्रियेनंतरचे...’ या विषयावर त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांशी संवाद साधला. मार्कंडेय सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रात सकाळी हा कार्यक्रम झाला. त्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची प्रचंड गर्दी होती.

रुग्णालयातील हृदय विभागाला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचे आयोजन करण्यात आले होते. पाच वर्षांत या विभागात १५०० शस्त्रक्रिया झाल्या. पैकी ८२५ शस्त्रक्रिया या राजीव गांधी आरोग्य विमा योजनेतून झाल्या. गरिबांना त्याचा मोठा लाभ झाला. अशा सर्व रुग्णांशी डॉ. अंधारे यांनी संवाद साधला. रुग्णालयाचे प्रेसिडेंट डॉ. शांताराम संगा, माजी प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांनी प्रास्ताविक केले. प्रशासन अधिकारी श्रीनिवास गोसकी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अरुण गोगी यांनी आभार मानले.

घसा बसण्यातून होतो शिरकाव
लहानपणीसर्दी, पडसे आणि घसा बसणे यावर योग्य उपचार केले नाहीत तर हृदयरोग होतो, हे कुणाला सांगितले तर नवल वाटेल. पण संशोधनातून ते खरे निघाले. घसा बसण्याच्या प्रकारात अँटीबायोटिक (प्रतिजैविके) दिली नाही तर त्यातील जंतू त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसतात. म्हणजेच किडनी, हृदयाच्या झडपा यांमध्ये ते जाऊन बसतात. त्यातून हा रोग काही वर्षांनी उद्भवतो. ९० टक्के रुग्ण अशाच प्रकारचे असतात, असेही डॉ. अंधारे म्हणाले.

हृदय रुग्णाशी घट्ट नाते
डॉ.अंधारे एका दिवसात एकच शस्त्रक्रिया करतात. त्यानंतर त्या रुग्णासोबतच राहतात. त्याच्या शेजारीच झोपतात. नातेवाईक घेणार नाहीत, एवढी काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे रुग्णाशी घट्ट नाते जुळलेले आहे. त्यांनी बोलावले म्हणून रुग्ण मोठ्या संख्येने आले. सभागृह गच्च भरले होते. त्यातून प्रत्येक रुग्णाचे नाव घेत डॉ. अंधार म्हणायचे, “शंकर गोळी बंद केल्यानंतर काय झाले माहीत आहे ना? तन्वीर क्या हो गया था तुझे?” अशा थेट प्रश्नांवर रुग्ण अतिशय नम्रतेने उत्तरे द्यायचे.

मार्कंडेय रुग्णालयाच्या संवाद कार्यक्रमात उपस्थित हृदयावर शस्त्रक्रिया झालेले आणि त्यांचे नातेवाईक. संवाद साधताना डॉ. विजय अंधारे

... तर मग माझ्या पैशातून गोळ्या
हृदयावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही आैषधे नियमित घ्यायची असतात. त्या टाळून चालणार नाही. त्या महाग वाटत असतील, तर मला सांगा. गोळ्या बदलून देतो. तेही शक्य नसेल तर माझ्या पैशातून देतो. पण गोळ्या घ्या. त्या आवश्यकच असतात. डॉ.विजय अंधारे
बातम्या आणखी आहेत...